श्री जोतिबा विकास आराखड्यांतर्गत कामे पुढील चैत्र यात्रेपूर्वी पूर्ण करणार :पालकमंत्री

 

श्री जोतिबा परिसर विकासाचा 25 कोटीचा आराखडा करण्यात आला असून 5 कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. या निधीतून जोतिबा विकास आराखडयांची तांत्रिक तसेच टेंडर प्रक्रीया येत्या आठवडाभरात पूर्ण केली जाईल. उर्वरीत 20 कोटी रूपये प्राधान्याने उपलब्ध करून घेवून श्री जोतिबा परिसर विकास आराखड्यांतर्गत सर्व कामे पुढील चैत्र यात्रेपूर्वी पूर्ण करण्याचा संकल्पही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. श्री जोतिबाची यात्रा मोठ्या भक्ती भावाने, उत्साहाने होत असून यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी प्रशासनाने उत्तमरितीने घेतली आहे. भाविकांना कसलाही त्रास होवू नये यासाठीही आवश्यक दक्षता आणि काळजी देवस्थान समिती आणि प्रशासनाने घेतली आहे. आपण सर्वजण वर्षानुवर्षे श्री जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी भक्तीभावाने येतो. कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी घेऊ या,असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, प्रांताधिकारी अजय पवार, सचिव विजय पवार तहसिलदार रामचंद्र चोबे, पोलीस उपअधिक्षक आर. आर. पाटील, शहर वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, मानवी विमेन्स वेलफेअर फौंडेशनचे संस्थापक अजितसिंह काटकर, शिवाजी सांगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आदि राज्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाची यात्रा भक्तीमय वातावरणात पार पडली. उंच सासनकाठ्या नाचवत व गुलाल-खोबरे उधळत भाविक देहभान विसरुन यात्रेत सहभागी झाले होते. विविध रंगांच्या सासनकाठ्यांमुळे जोतिबा मंदिराची शोभा वाढली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांचे स्वागत केले.
श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी सहजसेवा ट्रस्टच्यावतीने गायमुख परिसरात सुरू केलेल्या अन्नछत्रास सदिच्छा भेट देवून पाहणी केली.यावेळी त्यांच्याहस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. या ठिकाणी राजर्षि छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालय व सी. पी. आर. हॉस्पिटल यांच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान फिरत्या वाहनाचा शुभारंभही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, सहज सेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे, प्रमोद पाटील तसेच ट्रस्टचे अन्य पदाधिकारी, प्रांताधिकारी अजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पवार, तहसिलदार रामचंद्र चोबे,नायब तहसिलदार अनंत गुरव आदीजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!