आडवाटेवरचं कोल्हापूर ऑनलाईन नोंदणीचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ

 

कोल्हापूर : कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात येत आहे. या सहलीच्या ऑनलाईन नोंदणी सुविधेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला.
कोल्हापूरमध्ये पर्यटन विकासाची प्रचंडमोठी क्षमता असून अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी अनोळखी आहेत. यामधील आठ ठिकाणांचा समावेश असणारी दोन दिवसांची संपूर्णत: मोफत सहल एप्रिल व मे महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. दि. 13 एप्रिल पासून दर शुक्रवार व शनिवारी होणाऱ्या या सहलीचा पर्यटकांना लाभ घेता यावा यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सुविधेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी आडवाटेवरचं कोल्हापूर या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
आडवाटेवरचं कोल्हापूर ऑनलाईन नोंदणीचा सुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शासकीय विश्रामगृह येथे झाला. यावेळी संदीप देसाई, अनिल चौगुले, अमर अडके, उदय गायकवाड, अनिल पाटील, राहूल कुलकर्णी, आर.डी.पाटील, चारुदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूरच्या पर्यटन वृध्दीसाठी गेल्या काही दिवसांपासून जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेल्या वास्तु, विकसित केलेली स्थळे याशिवायही जिल्ह्यात नव्याने पर्यटन स्थळे विकसित होणे आवश्यक आहे. अलीकडील काळात कोल्हापूरातील रस्ते सुशोभिकरण, 303 फुट उंच ध्वजस्तंभासह पोलीस उद्यानाचे सुशोभिकरण, हायवेवरील नेचर गार्डन, फ्लॉवर फेस्टीवल, टुर ऑपरेटर्सची जिल्ह्यात विविध ठिकाणांना 5 दिवसाची भेट असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात पर्यटन वाढले तर जिल्हा श्रीमंत होईल, श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर जिल्ह्यात थांबून अन्य पर्यटन स्थळांना पर्यटकांनी भेट द्यावी, या पध्दतीने कोल्हापूरचे प्रेझेटेशन आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटनवाढीसाठी 2 दिवसांची जिल्ह्यातील 8 ठिकाणांचा समावेश असलेली दर शुक्रवार व शनिवार सहल आयोजित करण्यात आली आहे. एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या या सहलींमध्ये सुमारे 1400 लोकांच्या संपूर्णत: मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ऑफलाईन झालेल्या नोंदणीमध्ये 527 लोकांनी नोंदणी केली आहे. विविध माध्यमातून झालेल्या प्रसिध्दीमुळे लवकरच ऑनलाईन बुकींगलाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल.
दोन दिवसांच्या या सहलींमध्ये पोहळे-प्राचीन बौध्द कालीन गुहा, पावनखिंड, अणुस्कुरा, सांगशी, पळसंबा-अखंड शिळाशिल्प, चक्रेश्वर, काळमावाडी, शिवडाव-देवराई, पाटगाव-मौनी विद्यापीठ, नेसरी-युध्द भुमी स्मारक, शिरसंगी-महाकाय वटवृक्ष, किल्ले भुदरगड यांचा समावेश असल्याची माहिती उदय गायकवाड यांनी दिली. Unexplored Kolhapur या वेबसाईटवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
स्वामी समर्थ मुव्हीजचे संदीप जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शुर सरदार फर्जंद चित्रपटाचा ट्रेलर लॉचिंग पुसाटी बुरुजावर लवकरच करण्यात येणार असून 1 जून पासून महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट सर्व चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येईल, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!