
कोल्हापूर: राजा परांजपे प्रतिष्ठानच्यावतीने येत्या 14 ते 20 एप्रिल या कालावधीत कोल्हापुरात नववा राजा परांजपे महोत्सव संपन्न होणार आहे. गेली आठ वर्षे या महोत्सवाचे आयोजन प्रतिष्ठानच्यावतीने पुणे येथे यशस्वीपणे केले जात होते. पण यावर्षी हा महोत्सव मराठी चित्रपटाचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरात होत आहे.केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणाऱ्या या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते राजा परांजपे यांचे दहा चित्रपट दाखवण्यात येणार असून यावर्षी चा राजा परांजपे जीवनगौरव सन्मान ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना दिला जाणार आहे. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आजच्या पिढीला राजा परांजपे कोण आहेत याची माहिती व्हावी यासाठी अशी माहिती राजा परांजपे यांची नात सौ.अर्चना राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
उद्घाटनाच्या दिवशी चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चार कलावंतांचा सत्कार राजा परांजपे सन्मान देऊन करण्यात येतो. या वर्षीच्या पुरस्कारांसाठी अभिनेते संजय नार्वेकर,अभिनेत्री निर्मिती सावंत, संगीतकार अवधूत गुप्ते आणि व्हेंटिलेटर चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश म्हापुस्कर यांची निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी कोल्हापूरच्या महापौर सौ. स्वाती येवलुजे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात येईल. संपूर्ण महोत्सवामध्ये राजा परांजपे यांचे गाजलेले 10 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत ज्यांमध्ये लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, पुढचं पाऊल, पडछाया,पाठलाग, सुवासिनी वर्हाडी वाजंत्री, जगाच्या पाठीवर आणि गंगेत घोडं न्हालं यांचा समावेश आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. अशा कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी जरूर घ्यावा यासाठी गुणीदास फाउंडेशन व स्लिप वेल, राजारामपुरी तिसरी गल्ली येथे मोफत प्रवेशिका उपलब्ध आहेत असे गुणीदास फाउंडेशनचे राजप्रासाद धर्माधिकारी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ.अजित शुक्ल,अजय राणे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply