जिल्ह्यात कर्जमाफीची 361 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा: पालकमंत्री

 

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, खते, किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच यापुढील काळात जिल्ह्यात शेती उत्पादनावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी करण्यात कृषि विभागाने प्रकल्प हाती घ्यावा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केली.

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषि सहसंचालक कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी आदीजण उपस्थित होते.
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 4 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून शेतकऱ्यांना आवश्यक पायाभुत गोष्टी प्राधान्याने उपलब्ध करुन देवून उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्ठ डोळ्यसमोर ठेवावे, अशी सूचना करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आतापासूनच खरीपासाठी लागणाऱ्या बियाणांच, खतांचे आणि‍ किटकनाशकांची मागणी करुन वेळेवर शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. यामध्ये हयगय करता कामा नये तसेच शेतकऱ्यांना कृषि निविष्ठ दर्जेदार उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने गुणवत्ता नियंत्रण अधिक कडक करावी. जेणेकरुन शेतकऱ्यांची फसवणूक अथवा अडवणूक होणार नाही. अधिकाधिक निविष्ठांची गुणवत्ता नियंत्रण पथकाद्वारे तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गावोगावी भरारी पथकामार्फत तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण, पिक पध्दती, पाणी, खते यांची उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही देणे गरजेचे आहे. कृषि विभागाने याकामास प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली. जोपर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होत नाही, तो पर्यंत शेतकरी सुखी होणार नाही आणि उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होण्यसाठी मृद चाचणी करुन घेणे, पाण्याचे नियोजन करणे, ठिबक सिंचन करणे आवश्यक आहे. उन्नत शेती- समृध्द शेतकरी अभियान, शाश्वत ऊस उत्पादकता अभियानासह कृषि विभागाची सर्वच अभियाने गतिमानकरण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. राज्यात 10 लाख शेतकऱ्यांना शास्त्रशुध्द शेतीचं प्रशिक्षण देण्यासाठी एखाद्या एजन्सीच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात उन्नत शेती-समृध्द शेतकरी या मोहिमेअंतर्गत कृषि यांत्रिकी अभियान गतीमान केले असून गेल्या वर्षी या अभियानातून साडेबारा कोटी रुपयांचा खर्च करुन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर वितरीत करण्यात आले आहे. आज जिल्ह्यात मागेल त्याला ट्रॅक्टर, पॉवर टिलर उपलब्ध होवू शकतो, अशी अशाही त्यांनी व्यक्त केली.
मागेल त्याला वीज जोडणे ही भुमिका शासनाने घेतली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शेती पंपांना वीज कनेक्शन देण्याची विशेष मोहिम यंदा राबविण्यात येत असून जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या 8 हजार 494 शेती पंपांना वीज कनेक्शन देण्यासाठी 87 कोटीची गरज असून हा निधी प्राधान्याने उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!