
कोल्हापूर: देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणून-बुजून धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केंद्रशासन व भाजप प्रणीत इतर राज्य शासनांच्या चुकीच्या व त्वेषपूर्ण भूमिकेमुळे होत आहे. याच्या निषेधार्थ आज संपूर्ण देश राज्य व जिल्हा पातळीवर काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आले.याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आज काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता उपोषणास सुरुवात झाली. २ एप्रिल रोजी विविध संघटना यांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्यादिवशी भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या. हिंसाचार उफाळून आला अनेक निष्पाप जीव बळी पडले. त्याचबरोबर देशात विविध राज्यात जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पश्चिम बंगाल, बिहार ,उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये झालेल्या मागे भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग होता हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातही भीमा कोरेगाव येथे मराठा आणि दलित समाजामध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. याकरता भाजपशी जवळीक असलेले मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांचा सहभाग होता हे स्पष्ट असतानाही भाजपकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. असे संघर्ष निर्माण करणे हाच भाजपच्या रणनीतीचा भाग आहे का असा प्रश्न आज एक दिवसीय उपोषणात विचारण्यात आला. याचे मुख्य कारण म्हणजे हे सर्व दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारने कोणतेही उचित पाऊल उचललेले नाही. या सगळीकडे काँग्रेस पक्ष दुर्लक्ष करू शकत नाही. देशांमध्ये व राज्यांमध्ये विषारी जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न सत्तारूढ भाजपकडून होत असताना काँग्रेस पक्षाची जबाबदारी वाढली असून देशांमध्ये व राज्यामध्ये सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाला करावी लागणार आहे. याचाच एक भाग म्हणून आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घोषित केला. या आदेशानुसार आज कोल्हापुरातही एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील माजी आमदार पी .एन. पाटील माजी आमदार व समन्वयक मोहन जोशी, महापौर सौ. स्वाती येवलुजे, सरला पाटील, चंदा बेलेकर ,राजेश पाटील, सुशील पाटील यांच्यासह महापालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Leave a Reply