आडवाटेवरचं कोल्हापूर उपक्रमाचा उद्या शुभारंभ पालकमंत्री व अभिनेते भरत जाधव यांची उपस्थिती

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून, आडवाटेवरचं कोल्हापूर हा उपक्रम राबवला जाणार आहे. शुक्रवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची शाहू स्मारक, दसरा चौक येथून सुरुवात होईल. ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या उपक्रमातून प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसांची सहल आखली आहे. प्रत्येक सहलीत ९० ते १०० नागरिक आणि पर्यटकांची निवड करण्यात आली आहे. १३ एप्रिल ते २६ मे या दरम्यान प्रत्येक आठवड्यात दोन सहलीतून सुमारे २०० पर्यटक यानुसार एकूण १४०० पर्यटकांना आडवाटेवरचं कोल्हापूर दाखविले जाणार आहे. आजवर जी पर्यटनस्थळे फारशी प्रसिद्ध नाहीत, किंवा पर्यटकांनी पाहिलेली नाहीत, अशी पर्यटनस्थळे प्रामुख्याने या सहलीतून पाहता येतील. आडवाटेवरचं कोल्हापूर या उपक्रमाला कोल्हापूरकरांसह संपूर्ण राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रवास, निवास, भोजन संपूर्णपणे मोफत असलेल्या या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करणे आवश्यक होते. १ एप्रिल रोजी ऑनलाईन नावनोंदणीला प्रारंभ झाला आणि ३ एप्रिल रोजी सकाळ पर्यंत सुमारे ४ हजार पर्यटकांनी नोंदणी केली होती. त्यामुळे प्रथम येणार्‍या प्रथम या पद्धतीने पर्यटकांची निवड करण्यात आली असून, कोल्हापूर जिल्ह्याबाहेरचे संपूर्ण राज्यातील ६०० पर्यटक आणि स्थानिक ८०० पर्यटक, आडवाटेवरचं कोल्हापूर या उपक्रमात सहभागी होणार आहेत. पोहाळे, पावनखिंड, अणुस्कुरा, सांगशी, पळसंबा, चक्रेश्‍वरवाडी, काळम्मावाडी, नेसरी, पाटगाव, शिरसंगी, भुदरगड अशा ठिकाणांचा आडवाटेवरचं कोल्हापूर या सहलीत समावेश आहे. प्रत्येक सहलीत एक टूर गाईड, एक स्वयंसेवक आणि समन्वयक यांची टीम असेल. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र सहली निघणार असून, काही सहली संपूर्ण कुटुंबासाठीसुद्धा आहेत. पर्यटकांच्या निवास, भोजन व्यवस्थेसह त्यांना प्रत्येक पर्यटनस्थळाची शास्त्रीय आणि ऐतिहासिक माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी एक विशेष ध्वनी चित्रफित बनविण्यात आली आहे. हिल रायडर्स ऍन्ड हायकर्स फौंडेशन आणि ऍक्टीव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित या उपक्रमाला शुक्रवार पासून सुरुवात होत असून, कोल्हापूरच्या पर्यटन क्षमतेला चालना आणि बळ देण्यासाठी हा उपक्रम नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे. सर्वश्री उदय गायकवाड, प्रमोद पाटील, अनिल चौगुले, राहुल चिकोडे, चारुदत्त जोशी, सुजय पित्रे, डॉ. अमर आडके, राहुल कुलकर्णी, ऋतुजा काशीद, ओंकार कारंडे यांच्यासह हिल रायडर्स ऍन्ड हायकर्सचे स्वयंसेवक या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!