
श्री.श्री.रविशंकरजी यांच्या आगमनाची जय्यत तयारी पूर्ण;३१ जानेवारी रोजी ‘महासत्संग’
कोल्हापूर/प्रतिनिधी: पद्म विभूषित, जागतिक शांतीदूत, अध्यात्मिक गुरु, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री. श्री. रविशंकरजी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२३ या दोन दिवसात कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
श्री.श्रीं.च्या सानिध्यात मंगळवार दि. ३१ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता “महासत्संग” आहे. या महासत्संगाचा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गांवामधून तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि बेळगांव या नजीकच्या जिल्ह्यामधून सुमारे दीड लाख लोक लाभ घेतील. ‘गान, ज्ञान आणि ध्यान’ या संकल्पने नुसार सत्संगामध्ये सुश्राव्य भजन, श्री. श्रीं. द्वारा ज्ञानचर्चा आणि ध्यान होईल.
तत्पूर्वी श्री.श्री. जिल्ह्यातील नव निर्वाचित १०२५ सरपंचांना ‘गुरु ग्राम संदेश’ या कार्यक्रमाद्वारा मार्गदर्शन करतील. ‘देशाच्या सर्वांगीण विकासाचे रहस्य हे ग्रामीण भारताच्या विकासामध्ये आहे आणि ग्रामीण भारताला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्यास समाजातील शेवटची व्यक्ती सुखी होऊ शकते,’ यावर श्री.श्रीं.चा विश्वास असल्याने ग्रामीण भागात ‘आदर्श राज्य कारभार’ आणि ‘आदर्श ग्राम निर्मिती’ होऊन या गावांचा शाश्वत विकास व्हावा यासाठी ते सरपंच आणि लोक प्रतिनिधी यांना मार्गदर्शन करतील. यामध्ये ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तीस वर्षांपासून राबवली जाणारी ‘आदर्श ग्राम योजना’ आणि विविध ग्रामीण प्रकल्पांबाबत मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम मंगळवार दि. ३१ जानेवारीला दुपारी ४ वाजता श्री. राजमाता जिजामाता सभागृह, शिवाजी विद्यापीठ येथे होणार आहे. या कार्यक्रमास अन्य लोक प्रतिनिधींसह शिवाजी विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कुलगुरू उपस्थित असतील.
बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता दक्षिण काशी करवीर क्षेत्रामध्ये ‘महालक्ष्मी होम’ होत आहे. या होमासाठी विशेषतः बेंगळूरू आश्रम स्थित वेद विज्ञान महाविद्यापीठातील प्रशिक्षित वैदिक पंडित येणार आहेत. हा होम श्री. श्रीं.च्या सानिध्यात होत असल्याने याला एक आगळे महत्व प्राप्त आहे.
महासत्संग आणि महालक्ष्मी होम यांच्या तयारीसाठी नजीकच्या पाच जिल्ह्यातील शंभर आणि कोल्हापुरातील दीडशे प्रशिक्षक आणि हजारो स्वयंसेवक दोन महिन्यापासून तयारी करत आहेत. श्री.श्री. तेरा वर्षानंतर कोल्हापुरात येत आहेत.
२०११ मध्ये झालेल्या ‘अभंग नाद’ या कार्यक्रमात २२५० वारकरी आणि १३५६ धनगरी ढोल वादक यांनी सहभाग घेतला होता ज्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये आहे. त्यावेळी सव्वा लाख लोकांची उपस्थिती होती.
या ‘भक्ती उत्सव’ कार्यक्रमास दीड लाख पेक्षा जास्त लोक उपस्थित असतील. म्हणून हे दोन्ही कार्यक्रम ‘तपोवन मैदान, कळंबा रोड’ च्या ४० एकर मैदानात होत आहेत. यासाठी नेटकी वाहतूक व्यवस्था, ६ लाख स्क्वे. फुटाची बैठक व्यवस्था, २५ एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था, पार्किंग कडून ८ प्रवेश द्वारे, मुख्य रस्त्याकडून ५ प्रवेश द्वारे अशी १३ प्रवेश द्वारे निर्माण केलेली आहेत. श्री.श्रीं. चे सर्व उपस्थितांना दर्शन व्हावे आणि संपर्क साधता यावा म्हणून १२० बाय ६० चे भव्य स्टेज आणि १२ बाय २५० फुटचा रँप आहे. उत्कृष्ट ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था सह हजारो प्रशिक्षित स्वयंसेवक उपस्थितांच्या सुविधेसाठी असतील.तपोवन मधील दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन स्वामी प्रणवनंद आणि ऋषी देवव्रत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी डिंपल गजवानी, प्रदीप खानविलकर, मंदीर चव्हाण, प्रितम पटेल, अमोल येवले आदी उपस्थित होते.
Leave a Reply