
कोल्हापूर: तब्बल सहा वर्षानंतर कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होणार आहे. मंगळवार दि. १७ एप्रिल २०१८ पासून मुंबई-कोल्हापूर- मुंबई या मार्गावर विमान झेपावणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, त्याची फलनिष्पत्ती म्हणून कोल्हापूरची विमान सेवा सुरू होत आहे. पर्यटन आणि व्यापार-उद्योगाच्या वाढीसाठी कोल्हापूरची विमान सेवा सुरू होणे आवश्यक होते. मंगळवार पासून सुरू होणार्या विमान सेवेचा आनंद साजरा करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी अभिनव संकल्पना आखली आहे. मंगळवारी मुंबईहून कोल्हापूरला येणार्या विमानात कोल्हापूरच्या उद्योग जगतातील मान्यवर असणार आहेत. चेंबर ऑफ कॉमर्स, क्रिडाई, स्मॅक, गोशिमा, हॉटेल मालक संघ यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि उद्योजक यांना घेवून खासदार धनंजय महाडिक या पहिल्या विमान प्रवासात सहभागी होतील. तर कोल्हापूर ते मुंबई या विमान प्रवासासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी, सामान्य घरातील आणि विविध क्षेत्रातील मंडळींना सहभागी करून घेतले आहे. आजवर ज्यांनी विमान प्रवास अनुभवलेला नाही, किंबहुना खरे-खुरे विमान जवळून पाहिलेले नाही, अशांना खासदार महाडिक यांच्या दातृत्वातून विमान सफर करता येणार आहे. हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप या संस्थेतील दोन अपंग विद्यार्थी, अंधशाळेतील दोन विद्यार्थी, बालकल्याण संकुल मधील दोन अनाथ मुले, एकटी संस्थेमार्फत कचरा वेचक म्हणून काम करणार्या दोन महिला, बचत गटातील दोन महिला, शेतकरी दाम्पत्य आणि काही पत्रकार मंगळवारी कोल्हापूर ते मुंबई विमान प्रवास करतील. विमान प्रवासाचा आनंद गोरगरीब आणि सर्वसामान्य मुलांनाही मिळावा आणि कोल्हापूर ते मुंबई विमान सेवेचा शुभारंभ आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्हावा, यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर या महिला आणि मुलांना मुंबईतील काही पर्यटन स्थळे दाखवून वातानुकुलित आराम बस मधून पुन्हा कोल्हापुरला आणले जाईल.
Leave a Reply