अधिवेशनात लक्ष वेधलेल्या प्रश्नांवर शासन सकारात्मक :आम.जयश्री जाधव

 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रश्न, समस्याबाबत आमदार जयश्री जाधव यांनी २o२३ मधील पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, शासकीय ठराव या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले होते. आमदार जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून विविध प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरु केल्याची लेखी माहिती विधानसभेकडून देण्यात आली आहे. यामुळे शहरातील प्रश्न अणि नागरिकांच्या समस्या त्वरित सुटतील असा विश्वास आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महाअभियान राज्य योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील १६ रस्त्यांच्या कामासाठी ११०.३३ कोटी रु. निधीस त्वरित मान्यता द्यावी, याकडे अधिवेशनाचे लक्ष वेधले होते. कारण, या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी माझे पती व दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, आ.सतेज उर्फ बंटी पाटील, आ.ऋतुराज पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेचं या प्रकल्पास निधी मंजूर झाला होता. अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर या प्रकल्पाला मान्यता दिली असून पुढील कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे आदेश दिल्याचे शासनाने दिलेल्या पत्रात नमूद केलेल आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षि शाहू खासबाग मैदान या ऐतिहासिक वास्तूंच्या शताब्दी वर्षानिमित्त महानगरपालिकेत १० कोटी रु. निधी उपलब्ध झाला होता. त्यातून काम पूर्ण झाले असून उर्वरित दुसर्‍या टप्प्यातील कामासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी अधिवेशनात केली होती. त्यानुसार १ कोटी रु.निधी मंजूर करण्यात आला असून, त्याची निविदा प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरू असल्याचे शासनाने कळविले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील दुधाळी नाला, जयंती नाला, बापट कॅम्प नाला व लाईन बझार नाला या मलमिश्रणाच्या चार प्रकल्पास केंद्रपुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत केंद्र शासन शिखर समितीने मान्यता दिलेली आहे. सदर प्रकल्पांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता देवून प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरू असल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच शहारांतर्गत ३५० कोटी रु. ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव मंजुरीला असल्याचे सांगण्यात आले आहे.शाहू महाराज समाधी स्थळाच्या सुशोभीकरण व इतर कामासाठी मंजूर निधीवर स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठवावी अशी मागणी अधिवेशनात केली होती. त्यानुसार स्थगिती उठवण्यात आली असून ९ कोटी ४० लाख ५६ हजार रुपये इतक्या रकमेच्या कामांना राज्यशासनाने मान्यता दिली आहे. या कामांचा प्रारंभ शाहू जयंती दिवशी करण्यात आला आहे.शाहू मिलच्या जागेचा विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी शाहू मिलची जागा वस्त्रोद्योग महामंडळाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावी अशी मागणी अधिवेशनात केली होती. त्यासाठी शासकीय स्तरावर समिती गठित करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे पत्रात नमूद केले आहे.श्री. क्षेत्र महालक्ष्मी ( करवीर निवासीनी श्री.अंबाबाई) मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयास शासनाने संमती दर्शविली असून ७९.९६ कोटी रु. निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. यापैकी सरस्वती चित्रमंदिरानजीक बहुमजली पार्किंग बांधण्यासाठी रु. ७.९२ कोटी इतक्या निधीची कामे सुरु आहेत. वितरित केलेल्या रु. ८.२० कोटी पैकी रु. ५.५५ कोटी निधी महानगरपालिकेकडून खर्च झालेला असून रु. २.६५ कोटी निधी शिल्लक आहे. यामुळे उर्वरीत कामांसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी अधिवेशनात केली होती. त्यानुसार २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये २.५० कोटी रु. निधी मंजूर करण्यात आल्याचे शासनाने कळवले आहे. याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये सी.सी.टिव्ही यंत्रणा बसवणे, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, क्रीडा संकुल, तेजस्विनी बस योजना, उच्च न्यायालयाचे खंडपीठ आदी प्रश्नांवर शासन सकारात्मक असल्याचे पत्रात नमूद केलेले आहे.अधिवेशनात उपस्थित विविध प्रश्नांवर शासन सकारात्मक असून, कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने ही बाब समाधानकारक असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. तसेच येत्या पावसाळी अधिवेशनामद्धे शहरातील आणि मतदार संघातील समस्या लक्षवेधी व तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून मांडून जोरदार निधीची मागणी करणार असल्याचेही आ. जयश्री जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!