
कोल्हापूर/प्रतिनिधी: देशातील प्रसिद्ध चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री भारतरत्न डॉ बिधान चंद्र रॉय यांची जयंती व स्मृती दिनानिमित्त एक जुलै हा दिवस ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने हा दिवस सांगीतिक कार्यक्रम सादर करून साजरा केला. आपल्या अजरामर संगीताने ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले असे जतिन ललीत या संगीतकार जोडीतील ललित पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मेहंदी लगाके रखना’ हा कार्यक्रम कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात साजरा करण्यात आला. ललित पंडित यांनी संगीतबद्ध केलेली एकापेक्षा एक सरस गीते डॉक्टरांनी गायली. आणि उपस्थित रसिकांची मने जिंकली.
सततच्या धावपळीमुळे व ताणतणावातून थोडासा दिलासा मिळावा व डॉक्टरांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून केएमए आर्ट सर्कलच्या वतीने १९९९ सालापासून विविध कलाप्रदर्शनांचे आयोजन केले जाते. तसेच केएमए आर्ट सर्कलचे हे रौप्य
महोत्सवी वर्ष आहे. असे केएमएचे अध्यक्ष डॉ. किरण दोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. सचिव डॉ.सुरज पवार यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. स्वागत डॉ. मंजिरी वायचळ यांनी केले.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आयोजित ललित पंडित यांच्या संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचे डॉक्टरांनी सादरीकरण केले. तर काही डॉक्टर कलाकारांनी सदाबहार नृत्ये सादर केली.या खास कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ललित पंडित यांनी मेडिकल असोसिएशनचे आभार मानले. व कोल्हापूरकरांच्या भरभरून मिळालेल्या या प्रेमाने ते भारावून गेले. ललित पंडित तसेच त्यांचे प्रमुख संगीतकार रिचर्ड, उदयोन्मुख कलाकार अबीर पंडित आणि रोहांश पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ललित पंडित यांच्यासोबत अबिर आणि रोहांश यांनी कोई मिल गया हे सुप्रसिद्ध गीत सादर केले. याला उपस्थित प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली.
ये दिल सून रहा है, मुन्नी बदनाम हुई, तुझे देखा तो ये जाना सनम, ये काश के हम, रुक जा ओ दिल दीवाने, वादा रहा सनम, मै कोई ऐसा गीत गाऊ, आती क्या खंडाला, चांद सिफारस, मेहंदी लगाके रखना…अशी पंचवीसहून अधिक श्रवणीय गीते यावेळी डॉक्टरांनी सादर केली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.किरण दोशी, सचिव डॉ.सुरज पवार,खजनिस डॉ.शीतल देसाई, सल्लागार समिती सदस्य डॉ.आबासाहेब शिर्के, समन्वयक डॉ अशोक जाधव,कार्यक्रमाचे संकल्पक डॉ.राजेंद्र वायचळ, डॉ.आशुतोष देशपांडे,सांस्कृतिक सचिव डॉ. मंजिरी वायचळ, डॉ. उन्नती सबनीस यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि डॉक्टर्स उपस्थित होते.
Leave a Reply