जनसंवाद पदयात्रेत सहभागी व्हा; आ.जयश्री जाधव: दसरा चौकात होणार सभा

 

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूतपूर्व यशस्वी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. जिल्ह्यात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जनता काँग्रेस सोबत आहे. कोल्हापूर शहरातील जनसंवाद पदयात्रा शनिवारी (दि. ९) आहे. या पदयात्रेत शहरातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले.

कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार जाधव म्हणाल्या, देशात सरकारच्या दडपशाहीमुळे भितीचे वातावरण आहे. वाढती महागाई, महिलांवर अत्याचार, शेतीमालास भाव नाही, जातीय तेढ निर्माण करणे, विरोधकांचा आवाज दाबून लोकशाही- संविधान संपवण्याचे कटकारस्थान आदींमुळे जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी चीड आहे. जनतेच्या मनातील भिती दूर होण्यासाठी कॉग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रा सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पदयात्रेस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरात पदयात्रेबद्दल प्रचंड उत्सुकता असून, शनिवारच्या पदयात्रेत गर्दीचा उच्चांक ठरेल असा विश्वास आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.
शनिवारी दुपारी ३.३० वाजता चिव्याचा बाजार, आपटेनगर येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. पदयात्रेत आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक सहभागी होणार असून, दसरा चौक येथे सभेने पदयात्रेची सांगता होणार आहे, तरी शहरातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.यावेळी आमदार सतेज पाटील, सरलाताई पाटील यांनी मार्गदर्शन केले. माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, प्रताप जाधव, प्रवीण केसरकर, अर्जुन माने, काका पाटील, राजेंद्र साबळे, दिगंबर फराकटे यांनी विविध सूचना मांडल्या. यावेळी महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, उदय पवार, अक्षय शेळके, इंद्रजीत बोंद्रे, विजय सूर्यवंशी, सर्जेराव साळोखे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!