
संपादकीय….
त्यांना वाटते तेंव्हाच ते बोलतात. जे बोलायचं तेच बोलतात. ज्यावर बोलायचं ते सोडून नको त्यावर ते भरपूर बोलतात. इतके की कधीकधी त्यांचा घासाही बसतो. अन बसक्या घशानेही ते बोलत राहतात. जे जनात आहे ते यांच्या मनात कधीच नसतं. तरीही म्हणे हे ‘मन की बात’ करतात. खरे तर याला बोलक्या पोपटाची ‘मौन की बात’ असंच म्हणायला हवं.
त्यांनी म्हणे छोले भटूरे खाऊन भरल्या पोटी उपोषणाचा ढेकर दिला. यांनी तर 56 इंचाची छाती घेऊन नाट्यमय रित्या श्वास कोंडून घेतला. हे तेच आहेत एकेकाळी विरोधी पक्षात असताना संसदेचे अनेक तास यांच्या हट्टापुढे वाहून वाया गेले. तेव्हा यांनीही त्या गोंधळाचे समर्थनच केले. मात्र, आज यांना यांचा बाब्या दिसतोय. अन, दुसऱ्याचे ते कारटे.
दीन,दलित,दुबळे दररोज पिचले जात आहेत. लाखो तरुणांचा रोजगार हिरावला जातोय, अर्थव्यवस्था संकटात आहे, महिलांवरच्या अत्याचाराने तर कळस गाठला आहे. पण त्यावर यांना चकार शब्द बोलवत नाही. या विषयावर बोलायला यांची जीभच पुढे रेटत नाही. तर हे या विषयावर उपोषण काय 🔔🔔🔔 करणार..?
कश्मीर आणि उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या वेगवेगळ्या घटनांनी देश ढवळून निघाला. चौफेर निंदा झाली. पण यांचे समर्थन कोणाला? तर, गुन्हेगाराला. गुन्हेगार कोण? तर विद्यमान सत्ताधारी पक्षाचा आमदार (उत्तर प्रदेश) घटनेला एक वर्ष होऊनही ना तक्रार होती ना तपास. जणू काही घडलेच नव्हते. आता प्रधान सेवकाने म्हणे मौन सोडले आहे. हे महाशय बदबडणारे मौन सोडून बोलले. काय बोलले तर म्हणे न्याय मिळेल आणि तोही संपूर्ण. देशभर आणि जगभर देशाची नाचक्की झाल्यावर प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून दिली प्रतिक्रिया. ट्विटरवर ट्वीटची चिमणी उडवणाऱ्या लोकांसाठी प्रतिक्रिया द्यायला इतका वेळ लागावा यातच सगळे आले.
बेटी बचाव म्हणून ढोल पिटणारे हे लोक आरोपी बचाव म्हणत रॅली काढतात.( जम्मू काश्मीर)
मित्रहो, जागे व्हा! हीच देश कोणत्या दिशेला चाललाय हे ओळखण्याची. वेळ अजून गेलेली नाही. परिवर्तन करणे आपल्या हातात आहे. अन्यता भविष्यात हळहळ व्यक्त करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
ता.क. कोणी सांगावं भविष्यात हळहळ व्यक्त करायलाही कर मोजावा लागू शकेल. अन, हळहळ रक्षक दबा धरून बसलेले असतील चौकाचौकात अन कोपऱ्या कोपऱ्यात
– अण्णासाहेब चवरे
Leave a Reply