डॉ. संजय डी. पाटील यांचा सी.एस.आर हिरो’ पुरस्काराने सन्मान 

 

कोल्हापूर: डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते ‘सी.एस.आर. हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप “नवभारत”च्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी नवभारतचे अध्यक्ष रामगोपाल माहेश्वरी, बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर बजाज, मेघाश्रयच्या संस्थापिका सीमा सिंग आदी उपस्थित होते.”नवभारत”च्यावतीने शिक्षण व सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा दरवर्षी गौरव केला जातो. मुंबईतील आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे मंगळवारी झालेल्या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी कसबा बावडा येथे 1984 मध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर डॉ. संजय डी पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली गेल्या 40 वर्षात या ग्रुपचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ग्रुपच्या विविध महाविद्यालयामार्फत मेडिकल, पॉलीटेक्निक, नर्सिंग, फ़िजिओथेरपी, फार्मसी, कृषी, कृषी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी आदी विविध शाखामधील शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागात उच्च शिक्षण पोहचवण्यात महत्वपुर्ण योगदान दिले आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रियाही मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या कार्याबद्दल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना सीएसआर हिरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याना अत्याधुनिक सोई-सुविधायुक्त उत्तम शिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचे काम आमच्या सर्वच संस्थांमधून अव्याहतपणे सुरु राहील. असे डॉ. संजय डी पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना गौरव उद्गार काढले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!