डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.आर.के.शर्मा

 

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. आर. के. शर्मा यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. विद्यमान कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांचा कार्यकाल समाप्त झाल्याने डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठात झालेल्या विशेष कार्यक्रमात नव्या कुलगुरुंनी सूत्रे स्वीकारली.फेब्रुवारी २०२० पासून विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. आर. के. मुदगल कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाने फार्मसी कॉलेज, फ़िजिओथेरपी कॉलेज, अलाईड हेल्थ सायन्सेस, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट सारखी नवी महाविद्यालये सुरु झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापिठाला नॅकचे ‘ए++’ हे सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये डॉ. मुदगल यांनी मोठे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार कुलपती डॉ. संजय पाटील यांनी यावेळी काढले.डॉ. मुदगल यांचा कार्यकाल समाप्त होत असल्याने त्यासाठी राबवलेल्या अर्ज प्रक्रियेमध्ये देशभरातील ६५ जणांचे अर्ज प्राप्त झाले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून त्यातील १५ जणांच्या मुलाखती घेऊन तीन उमेदवारांची नावे कुलपतींकडे सादर करण्यात आले होते. यामधून डॉ. आर. के. शर्मा यांची कुलगुरू पदासाठी निवड करण्यात आली आहे.डॉ. शर्मा हे गेल्या ९ वर्षापासून डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असून ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ अशी त्यांची ओळख आहे. त्यापूर्वी त्यांनी आर्मी हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ सेवा दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नियामक मंडळावर ते कार्यरत आहेत. त्यांना ४० वर्षांहून अधिक काळाचा शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचा अनुभव आहे. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे.कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी मावळते कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत नवे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांचे अभिनंदन केले. डॉ. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ आणखी नव्या उंचीवर पोहचेल असा विश्वास व्यक्त करताना पुढील पाच वर्षात जगातील ५०० विद्यापीठामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. आर. के. शर्मा, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. के. प्रथापन, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. महादेव नरके, डॉ. अभिजित माने यांनी डॉ. मुदगल यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल शिंदे यांनी केले. यावेळी विविध संस्थांचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!