एनआयटीमध्ये ‘एमएसबीटीई’ची राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा संपन्न

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता, सर्जनशीलता व प्रतिभा विकसित व्हावी या उद्देशाने सदर स्पर्धा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उदघाटन शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरचे प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे, ‘प्रिन्स शिवाजी’चे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ‘प्रिन्स शिवाजी’चे अध्यक्ष बी. जी. बोराडे होते. स्पर्धेमध्ये पुणे विभागाच्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पॉलिटेक्निकच्या ४०५ विद्यार्थ्यांचे तब्बल ८१ ग्रुप त्यांच्या कॉलेजमधील सर्वोत्तम प्रोजेक्टसह सहभागी झाले असून स्पर्धेतील सर्वोत्तम प्रोजेक्टच्या पेटंटची प्रक्रिया तंत्रशिक्षण मंडळाकडून केली जाईल आणि या प्रोजेक्ट्समधून स्टार्टअप्स निर्माण होतील असा विश्वास असे एनआयटीचे संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला. अभ्यासक्रम शिकवण्यासोबत विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देत समाजातील प्रश्न प्रोजेक्टच्या माध्यमातून सोडवण्यास त्यांना सक्षम करण्यासाठी हे व्यासपीठ तंत्रशिक्षण बोर्डाने उपलब्ध केले आहे, असे कॅप्टन डॉ. नितीन सोनजे म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा वापर करून राष्ट्रउभारणीमध्ये आपले अमूल्य योगदान द्यावे असे प्रतिपादन चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांनी केले. या वर्षीच्या स्पर्धेत एवढ्या मोठ्या संख्येने संघ सहभागी झालेत, ही बाब अतिशय आनंददायी असून विद्यार्थ्यांच्या तंत्रशिक्षण मंडळ आणि एनआयटीवरील विश्वासाचे हे प्रतीक आहे असे गौरवोद्गार बी. जी. बोराडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात काढले. शासकीय अभियांत्रिकी कॉलेज कराडचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. कुलकर्णी, सीओईपीचे प्राध्यापक डॉ. महेंद्र साबळे, मुंबई येथील उद्योजक विलास तावडे व कोल्हापुरातील उद्योजक संजीव गोखले यांनी तंत्रशिक्षण मंडळातर्फे स्पर्धेचे परीक्षण केले. कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण, संचालक वाय. एल. खाडे, स्वाती निगडे, सविता पाटील, माजी महापौर सई खराडे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य समन्वयक प्रा. बाजीराव राजिगरे यांच्यासोबत एनआयटीमधील विभागप्रमुख व स्टाफ यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी तर आभारप्रदर्शन अधिष्ठाता डॉ. नितीन पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!