
कोल्हापूर. : छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील तीन चित्रपटांना सेन्सॅारची संमती मिळाली आहे. या चित्रपटांच्या प्रदर्शनाची पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती राजर्षी शाहु कृतज्ञता प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी रविवारी दिली.अक्षर दालन आणि निर्धार यांच्यावतीने आयोजित अक्षरगप्पांच्या ११७ व्या कार्यक्रमामध्ये प्रकट मुलाखतीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले. आम्ही डिजिटल स्वरूपामध्ये २४ तासांचे चित्रीकरण पहिल्यांदा निश्चित केले. त्यातील प्रत्येकी तीन तासांच्या तीन चित्रपटांची निर्मिती केली. त्याला सेन्सॅारची संमतीही मिळाली आहे. हे चित्रपट कसे प्रदर्शित करायचे याबाबतही नियोजन सुरू आहे.यावेळी एक प्रथितयश बांधकाम व्यावसायिक, एक सामाजिक कार्यकर्ता, कला, क्रीडा, आरोग्य, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रामधील संस्थांचे यशस्वी नेतृत्व अशा पाटील यांच्या चौफेर कार्याचा आढावा या प्रकट मुलाखतीमध्ये घेण्यात आला. समीर देशपांडे यांनी त्यांना बोलते केले. रवींद्रनाथ जोशी यांनी त्यांचे स्वागत केले.पाटील म्हणाले, मोठे आर्थिक पाठबळ नसताना रस्ते बांधकाम सुरू केले. परंतू कोणतेही काम दर्जेदार करण्याची शिस्त पाळली. त्यामुळे नाना बेरी, विक्रमसिंह घाटगे, नागनाथआण्णा नाईकवडी, अभयसिंहराजे भोसले अशा मोठया माणसांचा विश्वास मी मिळवला आणि कामे आपोआप चालत आली. यानंतर कोल्हापुरातील पहिला सहा मजली टॅावर उभारला. पहिली टाऊनशीप उभारली आणि पहिल्यांदा पहिल्या मजल्यावर पार्किंग असलेला प्रकल्प उभारला.आपल्या वाटचालीविषयी माहिती देताना पाटील म्हणाले, प्रख्यात गायिका किशोरी आमोणकर यांच्या आग्रहामुळे मी देवल क्लबची जबाबदारी स्वीकारली. कांचनताई परूळेकर यांच्या आग्रहामुळे स्वयंसिध्दामध्ये कार्यरत झालो. किमया शहा यांच्या लोटस फाऊंडेशनच्या माध्यमातून एचआयव्हीग्रस्तांसाठी काम केले. रोटरी क्लब, शाहू ब्लड बॅंक, महाराष्ट्र राज्य हौसिंग फेडरेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जिल्हा कुस्ती संघटना, बालकल्याण संकुल या विविध संस्थांच्या माध्यमातून काम केले. मुळातच सामाजिक कामाची आवड असल्यामुळे उद्योग, व्यवसाय सांभाळून या संस्थांसाठी वेळ दिला आणि संस्थांच्या उन्नतीसाठी पूर्ण योगदान दिले.यावेळी सतीश चव्हाण, नरेश बगरे, माजी जिल्हाधिकारी दिलीप जाधव, आर. के. पोवार, राजूभाई दोशी, रवींद्र तेंडुलकर, बबन देसाई, नितीन पाटील, रमेश पुरेकर, अनिल घाटगे, पदमा तिवले, श्रीकांत डिग्रजकर, श्रीनिवास मालू, बाजीराव खाडे, अशोक पोवार, सुनील देसाई, महादेव पाटील, संतोष मेघाणे, मानसी दिवेकर, विश्वास सुतार, प्रा. जे. के. पवार यांच्यासह पाटील कुटुंबिय उपस्थित होते.
Leave a Reply