कोल्हापूर :सजावटी फुलांचे उत्पादन हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आर्थिक संधीचे क्षेत्र आहे. यामध्ये पीक विविधतेच्या माध्यमातून शेतीत स्थिरता व आर्थिक शाश्वतता साधून उत्पन्नवाढ करणे शक्य आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषद – पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशालय, पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम यांनी केले. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या तळसंदे येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आणि कृषी विभाग कोल्हापूर व आत्मा यांच्या सहकार्याने “विकसित कृषी समृद्ध अभियान” अंतर्गत मजरे कासरवाडा, तिटवे आणि अर्जुनवाड (ता. राधानगरी) येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खरीप हंगाम पीक व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन सत्रामध्ये डॉ. कदम बोलत होते.
यावेळी डॉ. कदम म्हणाले, “परंपरागत पिकांच्या जोडीने शेतकऱ्यांनी आता उच्च मूल्य असलेल्या पिकांकडे वळण्याची गरज आहे. त्यामध्ये सजावटी फुलांचे उत्पादन हे एक मोठे आर्थिक संधीचं क्षेत्र आहे. बाजारपेठेत सजावटी फुलांना सातत्याने मागणी आहे. फुलशेतीमध्ये झेंडू, गुलाब, जरबेरा, रजनीगंधा, ग्लॅडिओलस, लिली इत्यादी पिकांचे नियोजन करून अल्प क्षेत्रातून अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळवता येतो.कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. जयवंत जगताप यांनी भात,ऊस उत्पादन तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ऊस उत्पादनात पाचट व्यवस्थापन ही एक महत्त्वाची प्रक्रिया असून, ती जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. उसाचे पाचट जाळण्याऐवजी त्याचा जमिनीतच सेंद्रिय खत म्हणून वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि सूक्ष्मजीवांची क्रिया सुद्धा वाढते. परिणामी, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून पिकांची उत्पादनक्षमता वाढते.सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील कांबळे, कृषी पर्यवेक्षक कल्याण कोंडे, कृषी सहायक युवराज सावंत, तालुका स्तरीय आत्मा समिती सदस्य अरविंद पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे दीपक पाटील, राजवर्धन सावंत भोसले व दीपाली मस्के यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply