कोल्हापूर/ प्रतिनिधी:दि. १३ जून २०२५ रोजी गंधार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ‘नभ उतरू आलं’ ही सांगीतिक, साहित्यिक व नृत्याविष्कारासह मैफिल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना प्रा. निशांत गोंधळी यांची असून या कार्यक्रमामध्ये पाऊसगाण्यांचा स्वरचिंब आविष्कार असणार आहे. शुक्रवार, दि. १३ जून रोजी सायकांळी ठीक ५.३० वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर याठिकाणी ही मैफिल रंगणार आहे. अशी माहिती निशांत गोंधळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या मैफिलीमध्ये निशांत गोंधळी, प्रल्हाद जाधव, रसिका झावरे, रणजीत बुगले, हर्षदा परीट यांचा स्वरसाज असणार आहे. तसेच अलिबागच्या नमन नृत्य संस्थेचे अमोल कापसे, शरण्या वाघमोडे, शाल्मली वाघमोडे हे कलाकार कथक नृत्याविष्कार साकारणार आहेत. रोहिणी वाघमोडे व निशांत गोंधळी यांचे निवेदन असणार आहे. तर शिवाजी सुतार (कीबोर्ड), केदार गुळवणी (व्हायोलिन), मनोज जोशी (ऑक्टोपॅड), गणेश साळोखे (गिटार), स्वानंद जाधव (तबला), विक्रम परीट (ढोलक-ढोलकी) यांची साथसंगत लाभणार आहे. ध्वनी संयोजन प्रशांत होगाडे, प्रकाश योजना अभिजीत मळगे आणि मंच सजावट सागर भोसले, मिलिंद अष्टेकर यांची असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.
गंधार वाद्यवृंदाने गेली १५ वर्षे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पना यशस्वी केल्या आहेत. त्यामध्ये ‘को जागरति’, ‘घन ओथंबून येती’, ‘सूर निरागस हो’, ‘भक्तीचा वेलू गगनावरी, ‘देह भरिला विठ्ठल’, ‘भावरंग’, ‘आम्हां नादी विठ्ठलु’, ‘पाऊलखुणा महाराष्ट्राच्या’, ‘भक्तिरंग’ या कार्यक्रमांचा समावेश असून ‘नभ उतरू आलं’ या मैफिलीचाही रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन गंधार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष निशांत गोंधळी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी निशांत गोंधळी 9049957278 या क्रमांकावर संपर्क साधावा. पत्रकार परिषदेस राजेंद्रकुमार गोंधळी,सुनित गोंधळी,प्रल्हाद जाधव,रणजीत बुगल,श्रुती लवटे उपस्थित होते.

Leave a Reply