गोकुळ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा सत्कार

 

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्‍था मर्या., कोल्‍हापूर संस्‍थेच्‍या राजारामपुरी येथील कार्यालयास गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष नविद हसन मुश्रीफ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन सचिन पाटील यांच्या हस्ते गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक किसन चौगले यांचा सत्कार पतसंस्थेच्या पदाधिकारीच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ कर्मचारी पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची संस्था नसून, गोकुळच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा व विश्वासाचा आधार आहे. गेल्या अनेक वर्षांत या संस्थेने सभासद कर्मचाऱ्यांना त्यांच्या विविध गरजांसाठी अत्यल्प व्याजदराने कर्जे उपलब्ध करून दिली आहेत. गोकुळच्या प्रगतीच्या वाटचालीत कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून  त्यांचे आर्थिक हित जोपासणाऱ्या कर्मचारी पतसंस्थेची भुमिका भविष्यात आणखी बळकट व्हावी, यासाठी संघाच्या वतीने आवश्यक ती मदत व सहकार्य केले जाईल तसेच भविष्यातील कर्मचाऱ्यांची आर्थिक गरज ओळखून नव्या सुविधा सुरू करण्याची गरज असल्यास संघाचे व व्यवस्थापनाचे संस्थेस नेहमीच पाठबळ राहील, असे आश्वासनही गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिले.

पतसंस्थेचे चेअरमन सचिन पाटील यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या प्रगतीची व कामकाजाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पतसंस्थेने वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार कर्ज मर्यादा वाढविणे, योग्य व्याजदर, ठेवी योजना आणि विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे कर्मचारी वर्गाचा संस्थेवरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे. आभार संचालक राजेंद्र चौगले यांनी मानले .माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक किसन चौगले, गोकुळ कर्मचारी पतसंस्‍थेचे चेअरमन सचिन पाटील, व्हा.चेअरमन पांडुरंग कापसे, संचालक राजेंद्र चौगले, जयदिप आमते, रामचंद्र पाटील, तुकाराम शिंगटे, सुनिल वाडकर, संदेश भोपळे, दत्तात्रय डवरी, अशोक पुणेकर, गिता उत्तुरकर, पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर तसेच पतसंस्थेचे कर्मचारी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!