कोल्हापूर: मराठी, नाटय आणि चित्रपट सृष्टी गाजवलेल्या स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या जीवनावर आधारीत माहितीपट बनवण्यात आला आहे. या माहितीपटाचा प्रीमिअर शो रविवार दि. २२ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता कोल्हापुरातील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात होणार आहे. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. तर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांचीही प्रीमिअर शोसाठी उपस्थिती असेल.
कोल्हापूर ही अरूण सरनाईक यांची जन्म आणि कर्मभूमी होती. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अजरामर कलाकृतींमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ४ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या अरूण सरनाईक यांचा २१ जून १९८४ रोजी दुर्दैवी अकाली मृत्यू झाला. ७० च्या दशकात रंगभूमी आणि सिनेसृष्टीला एक देखणा चेहरा मिळाला तो, अरूण सरनाईक यांच्या रूपाने.. व्यावसायिक रंगभूमीवरून अभिनय क्षेत्रात आलेल्या अरूण सरनाईक यांनी शाहीर परशूराम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मुंबईचा जावई, एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. नाटकात काम करताना त्यांचा अभिनय हा अभिनय नसून त्यात जिवंतपणा वाटायचा. तबला, ढोलकी, पेटी, तंबोर्याची साथ अशा वाद्यांमध्ये निष्णात होते. गाणं उपजत अंगात असल्यामुळे कोणतही गाणं किंवा अभंग त्यांना सहजपणे गाता यायचे.
२१ जून १९८४ रोजी एका अपघातात अरूण सरनाईक यांचा मृत्यू झाला. तर त्याच अपघातात अरूण सरनाईक यांच्या पत्नी आणि मुलगा हे सुध्दा मृत्यूमुखी पडले. मराठी कलाविश्वासाठी तो एक फार मोठा आघात होता. दरम्यान कै. अरूण सरनाईक यांची कन्या डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी पुढाकार घेवून, हा माहितीपट बनवला आहे. चतुरस्र अभिनेते स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या आयुष्याचा, कला आणि जीवन प्रवासाचा वेध घेणारा हा माहितीपट डॉ. संतोष पाठारे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर याची संकल्पना विशाखा तुंगारे-देशपांडे यांची आहे. डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांची निर्मिती असलेल्या, पप्पा सांगा कुणाचे, या माहितीपटाचा कालावधी ७५ मिनिटांचा आहे. अरूण सरनाईक यांच्या आठवणी, त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया या माहितीपटामध्ये पाहता येतील. रविवारी सकाळी साडेदहा वाजता देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात या माहितीपटाचा प्रीमिअर शो होणार आहे. त्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. सरनाईक परिवाराशी कोल्हापुरातील अनेकांचा स्नेह टिकून आहे. स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनावरील माहितीपटाच्या प्रीमिअर शो साठी कोल्हापुरकरांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन सौ.सविता सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केले.पत्रकार परिषदेस रणजित नाईकनवरे नील नाईकनवरे उपस्थित होते.

Leave a Reply