कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) आदी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या गरीब, गरजू, होतकरू, दिव्यांग व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ‘आकार’ देण्यासाठी पुण्यातील आकार फाउंडेशनतर्फे राज्यभर ‘आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक विभागातील 300 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती आकार फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रा. राम वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी आकार फाउंडेशन, पुणेचे व्यवस्थापकीय संचालक प्रा. प्रवीण मुंढे, कोल्हापूर विभाग व्यवस्थापक रवी नंदेश्वर उपस्थित होते.प्रा. राम वाघ म्हणाले, “ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी व कष्टकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करण्याची क्षमता, गुणवत्ता व स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे सामर्थ्य असूनही प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे असे अनेक विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यापासून वंचित राहतात. अशा गुणवान विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या गुणवत्तेनुसार यश मिळवण्याच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आकाराला आणता यावे, यासाठी आवश्यक स्पर्धा परीक्षांचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीची रचनात्मक यंत्रणा उपलब्ध उपलब्ध करून देता यावी, यासाठी आकार फाउंडेशन पुणेच्या माध्यमातून पुणे, कोल्हापूर, सोलापूर व औरंगाबाद विभागात हे स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, जळगाव, नाशिक, अमरावती, नागपूर, यासह राज्याच्या इतरही जिल्ह्यात या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.”
“या शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेचे आयोजन दि. 21 मे 2018 रोजी कोल्हापूर, दि.23 मे 2018 रोजी सोलापूर, दि 25 मे 2018 रोजी उस्मानाबाद आणि दि. 27 मे 2018 रोजी पुणे येथे अयोजन करण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षेच्या पेपरचे स्वरूप युपीएसीसी व एमपीएससी पूर्व परीक्षेसारखे असणार आहे. या लेखी परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या आकार फाउंडेशन पुणे येथे दि 29 मे ते 5 जून 2018 या कालावधीत मुलाखती घेतल्या जाणार आहेत. लेखी परीक्षा व मुलाखती याद्वारे विभागवार गुणवत्तेनुसार निवड झालेल्या 100 विद्यार्थ्यांना 100 टक्के (एमपीएससी 50, यूपीएससी 50) व इतर 200 विद्यार्थ्यांना 50 टक्के (एमपीएससी 100, यूपीएससी 100) शिष्यवृत्ती दिली जाणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आकार फाउंडेशन पुणे येथे व्यवस्था केली जाणार आहे.”
“या शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेला 12 वी उत्तीर्ण, पदवीला असलेले व कोणत्याही शाखेतील पदवीधर झालेले विद्यार्थी बसू शकतील. 12 वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.aakarfoundation.org या संकेतस्थळास भेट द्यावी. या परीक्षेचा निकाल फाउंडेशनच्या संकेतस्थळावर 28 मे 2018 रोजी जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी आकार फाउंडेशनच्या पुणे व नागपूर कार्यालयात अथवा 8767930930/9112078538 या क्रमांकावर संपर्क साधावा,” असे प्रा.प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

Leave a Reply