देशात उच्चांकी १३६ कोटी रुपये अंतिम दूध दरफरक देणारा ‘गोकुळ’दूध संघ

 

कोल्हापूर, ता: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून पारदर्शक पद्धतीने काम करणारा राज्यातील अग्रगण्य सहकारी दूध संघ आहे. सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात व्यापारी नफा २१५ कोटी ८७ लाख इतका झाला असल्याने गोकुळने देशातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल १३६ कोटी रुपये अंतिम दूध दरफरक म्हणून वितरित करून देशातील क्रमांक एकचा दूध संघ म्हणून ओळख मिळवली आहे, अशी माहिती गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी दिली.

गोकुळची डिबेंचर योजना ही कोणतीही नवीन योजना नसून, सन १९९३ पासून म्हणजेच मागील ३२ वर्षांपासून सतत राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना संघाने सल्लागारांचे मार्गदर्शन घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहे. दरवर्षी ३१ मार्च रोजी ताळेबंद नफा तोटा पत्रक तयार करून तो वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जातो. सन २०२४–२५ चा ताळेबंद वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला असून, त्याची अंमलबजावणी करणे हे बंधनकारक आहे.

गोकुळने आजपर्यंत कोणत्याही दूध संस्थेची ४० टक्के डिबेंचर कपात केलेली नाही. संघाकडून १९९३ पासूनच संस्थांना डिबेंचर्स दिले जात असून, संस्था सक्षमीकरण आणि आर्थिक स्थैर्यासाठी ही योजना राबविली जाते. आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये संस्थांना प्रति लिटर सरासरी रु. १.२५ प्रमाणे डिबेंचर्स दिले आहेत. डिबेंचर्स व दर फरकाची सर्व माहिती ७ ऑगस्ट २०२५ रोजीच्या खातेउताऱ्यातून संस्थांना देण्यात आली आहे. डिबेंचर्स स्वरूपात निधी उभारण्यासाठी संघाने वार्षिक सर्वसाधारण सभेची तसेच शासनाची मंजुरी घेतली आहे. ३१ मार्च २०२५ अखेर गोकुळने रु. १४४ कोटी १६ लाख २६ हजार ५०० इतकी रक्कम डिबेंचर्स स्वरूपात उभारली असून, त्यापैकी रु. ७२ कोटी ७८ लाख ४ हजार ३८८ इतकी रक्कम २०२४–२५ च्या अंतिम दरफरकातून संस्थांना देण्यात आली आहे. ही रक्कम भविष्यात संस्थांच्या वसूल भागभांडवलामध्ये रूपांतरित होणार आहे.

 

One response to “देशात उच्चांकी १३६ कोटी रुपये अंतिम दूध दरफरक देणारा ‘गोकुळ’दूध संघ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!