मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, मिसळ कट्टा कार्यक्रमातून संवाद साधणार

 

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी, राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. उद्या सोमवारी १२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता हॉटेल पॅव्हेलियन येथे आयोजित केलेल्या मिसळ कट्टा या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील सुमारे एक हजार तज्ञ आणि प्रतिष्ठित मान्यवरांना, या कार्यक्रमासाठी भाजपच्या वतीने निमंत्रित केले आहे.
मिसळ कट्टा या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री महोदयांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. त्यातून महायुती सरकारची कामगिरी, व्हिजन आणि कोल्हापूर महानगरपालिकेसाठी राज्य शासनाची भूमिका याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस माहिती देणार आहेत. कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न, केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने आजवर कोल्हापूरला दिलेला निधी आणि त्यातून मार्गी लागलेली विकास कामे, तसेच महायुती सरकारचे धोरण आणि लोकहिताच्या योजना याबद्दल मुख्यमंत्री थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण कोल्हापुरातील स्थानिक वाहिनीसह विविध अन्य वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून होणार आहे. तर कोल्हापूर शहरातील वीस प्रभागात एकूण 40 ठिकाणी एलईडी स्क्रीन द्वारे मुख्यमंत्र्यांच्या प्रकट मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील थेट प्रक्षेपणाची जागा निश्चित करून, सोमवारी दुपारी बारा वाजता आपल्या प्रभागातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांचे विकासाचे व्हिजन समजून घेता येईल, अशी व्यवस्था केली आहे. शहरातील 40 ठिकाणी भव्य स्क्रीन, ध्वनी व्यवस्था, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली असून, महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांची ही प्रकट मुलाखत अत्यंत प्रभावी ठरेल यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

Comments are closed.

error: Content is protected !!