कोल्हापूर :डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचा तिसरा दीक्षांत समारंभ सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. उद्योगपती किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष विलास शिंदे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर्स (डि.लीट.) तर ओंस्ट्रो टेक्नोलॉजी प्रा. लि.चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भावित नाईक यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) या मानद पदवीने सन्मानित केले जाणार आहे. तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी येथे सायंकाळी ५ वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील व कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता यांनी दिली. यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए. खोत, परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे उपस्थित होते.
दीक्षांत समारंभात एकूण ९१२ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यामध्ये ११ विद्यार्थ्यांना पीएच. डी. देण्यात येणार असून यावेळी १५ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गुप्ता यांनी यावेळी दिली. विद्यापीठाच्या ७० टक्केहून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे. १०० हून अधिक संशोधन असून २४ पेटंट प्राप्त झाली आहेत. अनेक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी संजय किर्लोस्कर हे चौथ्या पिढीतील उद्योगपती असून ते किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सीआयआय वेस्टर्न रीजनचे अध्यक्ष होते. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत. देश विदेशातील अनेक संस्थावर ते कार्यरत आहेत.
