कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने गोकुळचे शिल्पकार स्व. आनंदराव ज्ञा.पाटील (चुयेकर) यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्य प्रतिदिन २० लाख लिटर्स दूध संकलन पूर्तीचा अमृत कलश पूजन कार्यक्रम गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला. हा अमृत कलशाचे पूजन गोकुळ मध्ये कार्यरत असलेले ११ ज्येष्ठ कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफसो म्हणाले, “मागील वर्षी स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुण्यतिथीला १८ लाख लिटर दूध संकलनाचे अमृत कलश पूजन केले होते. त्यावेळी २० लाख लिटरचा संकल्प केला होता आणि आज तो यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे.” अण्णासाहेब पाटील महामंडळ तसेच इतर महामंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दूध उत्पादकांनी या योजनांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुढील स्मृतीदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाने अमृत कलश पूजन होईल,असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे मत यांनी व्यक्त केले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नाम.प्रकाश आबिटकर म्हणाले, गोकुळ दूध संघाचा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विश्वासाच्या बळावरच गोकुळने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून, ही कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. गोकुळचे एकूण अर्थकारण शेतकऱ्यांच्या हिताशी थेट जोडलेले असून, त्यामुळेच हा संघ सर्वसामान्य दूध उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. सत्तेवर आल्यानंतर त्या काळात गोकुळचे दूध संकलन १२ ते १३ लाख लिटर इतके होते. मात्र, २० लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प सर्वांनी एकत्रितपणे केला आणि तो आज यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. आज महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दूध संघांमध्ये गोकुळचा अग्रक्रम लागतो.यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, “आज गोकुळ दूध संघाने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून, ही कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीची, विश्वासाची आणि संघाच्या सक्षम नेतृत्वाची पावती आहे.ते पुढे म्हणाले, “गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शेतकऱ्याला अधिक दर मिळालाच पाहिजे, ही ठाम भूमिका घेण्यात आली. मात्र केवळ दरवाढ पुरेशी नसून दूध संकलन व विक्री दोन्ही वाढवणे आवश्यक होते. त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे आज २० लाख १६ हजार लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळचे माजी चेअरमन स्व.आनंदराव पाटील चुयेकर साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गोकुळने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला हा क्षण गोकुळ कुटुंबासाठी अभिमानाचा आहे. अवघ्या ७०० लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला गोकुळचा प्रवास आज कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा आहे. ग्रामीण भागातील दूध शहरी बाजारपेठेत जावे आणि शहरातील पैसा ग्रामीण भागात यावा, ही स्व. चुयेकर साहेबांची दूरदृष्टी होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये गोकुळचे दूध पोहोचले. आज मुंबईत प्रतिदिन ९ लाख तर पुण्यात ५ लाख लिटर दूध विक्री होत आहे.”
यावेळी गोकुळ प्रकल्प येथे नवीन बसवण्यात आलेल्या २ मेट्रिक टन प्रतितास क्षमतेचा अत्याधुनिक कंटीन्युअस बटर मेकींग मशिन, २००० केव्हीए नवीन जनरेटर सेट व गडमुडशिंगी येथील महालक्ष्मी टी.एम.आर.प्लांट विस्तारीत युनिट चे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून ते कार्यान्वित करण्यात आले. २० लाख लिटर दूध संकलन पूर्ण झाल्याबद्दल गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार शाहू छत्रपती दूध संस्था शिरोली, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा सत्कार हनुमान दूध संस्था वडकशिवाले, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचा सत्कार ज्योतिर्लिंग दूध संस्था कातळेवाडी तसेच सर्व संचालक मंडळाचा सत्कार दूध संस्था सचिव संघटनेच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाचे स्वागत ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले. आभार संघाचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, माजी खासदार निवेदिता माने, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, के.डी.सी.सी.बँकेचे संचालक भैय्या माने, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
