कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या अनुषंगाने नूतन नगरसेवकांचा सत्कार समारंभ महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार धनंजय महाडिक आणि महायुतीचे सर्व नेते यांनी उपस्थित राहून सर्व नूतन नगरसेवकांचे अभिनंदन केले.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या वतीने जो जाहीरनामा कोल्हापूरच्या जनतेसमोर ठेवला होता, त्या जाहीरनाम्यातील विकासाच्या धोरणाला प्राधान्य देऊन कोल्हापूरच्या मतदारांनी भरभरून महायुतीला मतदान करून महायुतीचे ४५ नगरसेवक निवडून दिले, याबद्दल आभार मानले.
तसेच या निवडणूक कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी योग्य मार्गदर्शन केले. व या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
केंद्रात राज्यात व आता महानगरपालिकेमध्ये महायुतीचे मजबूत सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागाच्या विकासाच्या संकल्पना तयार कराव्यात व आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक नियोजन पूर्व आराखडा तयार करावा असे आवाहन नूतन नगरसेवकांना केले गेले.
कोल्हापूरच्या विकासाच्या संकल्पनेमध्ये K-DAC Kolhapur Development Action Committee स्थापन करून महानगरपालिकेतील नगरसेवक तसेच कोल्हापूर शहरातील काही नामांकित संघटना, असोसिएशन तसेच सेवाभावी संस्था यांना एकत्रित करून वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासासाठी जो जाहीरनामा तयार केला आहे, तो अमलात आणण्यासाठी महायुती म्हणून सर्वजण प्रयत्नशील आहोत. असे मत यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, प्राध्यापक जयंत पाटील, महेश जाधव, विजय जाधव, आदिल फरास, सुजित चव्हाण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी नूतन नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
