कोल्हापूर: समाजातील अठरापगड जातीतील कारागीरांच्या वर्गातील विणकाम करणारे, लोहार असे व्यवसाय काळाच्या ओघात नामशेष झाले आहेत. या कारागिरांच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाने त्यांना कायमस्वरुपी व्यासपीठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे, असे जिल्ह्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थ नोकरीनिमित्त मुंबईसारख्या महानगरात स्थलांतरित झाली आहेत. खरेतर कोल्हापूर जिल्हा निसर्ग, संसाधने आणि दरडोई उत्पन्नात अग्रेसर असूनही या नागरिकांच्या हाताला पर्यटन उद्योगांतून रोजगारप्राप्ती होवू शकते. या दृष्टीनेही राज्य सरकारने जाणिवपूर्वक प्रयत्नशील रहावे, असे आवाहन प.पू. काडसिध्देश्वर स्वामी यांनी केले. कणेरी मठावर आयोजित केलेल्या कारागिरी महाकुंभ उपक्रमाच्या सांगता समारोपावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आम. राहूल आवाडे, म्हाडाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे नेते समरजित घाटगे, गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी, कोल्हापूर व पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी येथील मुख्य प्रवेशद्वार येथे कारागीर महाकुंभ भरवण्यात आला होता. ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्या या उपक्रमाची सांगता शनिवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.
प. पू. काडसिध्देश्वर स्वामी म्हणाले, महात्मा गांधीजी यांनी खेड्याकडे चला, असा महत्वपूर्ण संदेश दिला होता. आजच्या काळातही हा संदेश लागू पडणारा आहे. मात्र, स्थानिकांना त्यांच्याच जिल्ह्यात रोजगार मिळाला तर ती खेडी स्वयंपूर्ण होतील आणि महानगरांकडे वळणाऱ्या लोंढ्यांना थोपविता येवू शकेल. आपल्याकडे अठरापगड जातीतील सर्व कारागीर पूर्वी अस्तित्वात होते. आता त्यातील लोहार, विणकाम करणारे असे कारागीर पहायला मिळत नाहीत. यासाठी कारागीरांना प्रोत्साहान देण्याची अत्यंत गरज आहे, देशात जवळपास १० कोटी कारागिर असून त्यांच्यासाठी केंद्राची विश्वकर्मा योजना आहे, त्याचाही लाभ घेता येवू शकेल, असेही असेही काडसिध्देश्वर स्वामी यांनी बोलून दाखवले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, २०१४ पूर्वी देशात ३५० स्टार्टअप होते. आज ४ लाख स्टार्टअप आहेत. काडसिध्देश्वर स्वामी यांना मी महाराज असे न संबोधता मी शास्त्त्रज्ञ असे म्हणतो. कारण ते वारंवार नवनवीन प्रयोग करतात. कारागीर महाकुंभांचा मेळावा भरवता येवू शकतो, हा विचार कोणाच्याही मनाला शिवणार नाही. मात्र, या ठिकाणी हे शक्य झाले आहे. या कारागीर महाकुंभाच्या माध्यमातून हजारो जण प्रेरणा घेवून जाणार आहेत. हस्तकलेला जगभरात मोठी किंमत आहे. यातून भविष्यात या कारागिरांना मोठ्या संधी उपलब्ध होवू शकणार आहेत..कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जालंदर पाटील, यशवर्धन बारामतीकर, जे. पी. वड्ड, डॉ. वर्षा पाटील, रविंद्र लाड, बसंतकुमार सिंग खादी ग्रामोद्योग संयोजक , विवेक सिद्ध, विक्रम पाटील, विजय सरगर, प्रल्हाद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक यशोवर्धन बारामतीकर तर सूत्रसंचालन विवेक सिध्द यांनी केले.
गेली पाच दिवस चालेल्या या कारागिर महाकुंभमध्ये १७ राज्यातून सुमारे २०० कारागिरी सहभागी झाले होते. कारागीरांच्या साठी पूर्णपणे मोफत स्टॉलसह येण्याजाणायचा खर्च हि सिद्धगिरी संस्थान मठाने दिला हे या महोत्सवाचे विशेष वैशिष्ठ्य होते. यावेळी लोकांचा प्रतिसाद इतका प्रचंड होता कि सर्व स्टॉलधारकांच्या अभिनव कलाकुसरींची विक्री अतिशय विक्रमी प्रमाणात झाली. तसेच विविध तंत्रज्ञ व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाच दिवस प्रकल्प सादर केले. गेल्या पाच दिवसात तब्बल ४ ते ५ लाख लोकांनी या महोत्सवास भेट दिली.
