कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल : आमदार राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा आसपासच्या सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह सीमा भागाशी निगडीत असून, या सर्वांचे केंद्र स्थान कोल्हापूर आहे. कोल्हापूर जिल्हा विविध कलागुणांना वाव देणारा जिल्हा असून, कोल्हापूर जिल्ह्यात इंजिनीअरींग असोसिएशन, आर्किटेक्ट असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन, बार कोन्सील अशा विविध संघटना या ठिकाणी कार्यरत आहेत. परंतु, विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. यामुळे विचारांचे आदान- प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर मर्यादा येत आहेत. यावर पर्याय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात आधुनिक सोयी सुविधांनी युक्त आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर निर्मिती करण्याची मागणी मी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास प्रशासकीय मंजुरी दिली होती. यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली होती. सदर निधी प्रशासनाकडे वर्ग झाला असून, कन्व्हेन्शन सेंटरच्या कामास गती प्राप्त झाली आहे. येत्या काळात कन्व्हेन्शन सेंटर मुळे कोल्हापूरच्या औद्योगिक, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाणार असून, कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

यावेळी सूचना देतान आमदार राजेश क्षीरसागर यांनी, प्रकल्पाच्या कामात कोणताही विलंब होऊ नये, तो दिलेल्या मुदतीतच पूर्ण व्हावा, कामाचा दर्जा उत्कृष्ठच असावा, यामध्ये कोणतीही हयगय चालणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांना याकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. हे केंद्र केवळ राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठीच मर्यादित न राहता, उद्योग, व्यापार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मोठ्या परिषदांसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे हे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसे असावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

 

Comments are closed.

error: Content is protected !!