मुंबई: अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना आपण सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर पाहतो. या क्षेत्रात मिळणारा पैसा व माया यांची चर्चा आपण ऐकतो. पण प्रसिद्धीच्या पडद्याबाहेर गेल्यावर त्या कलाकारांच्या आयुष्यामध्ये किती दुःख असते ते आपल्याला कधीही दिसत नाही. अशा या जेष्ठ कलाकारांसाठी दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख यांसारख्या कलाकारांनी एकत्र येऊन जेष्ठ कलाकारांचे दुःख, त्यांच्या गरजा, त्यांचे आजारपण यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी CAWT सारखा एक मंच तयार केला असून या संस्थेतर्फे केले जाणारे काम अतिशय कौतुकास्पद आहे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईत केले.सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने CAWT च्या स्थापनेत आणि CINTAA – CAWT टॉवरच्या उभारणीत ज्या विश्वस्थ कलाकारांनी आपले अमूल्य योगदान दिले, त्यामध्ये प्रामुख्याने सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख, अमरीश पुरी, अमजद खान, चंद्रशेखर वैद्य, दारासिंह या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी त्या कलाकारांचे फोटो आणि माहिती देणाऱ्या फलकाचे उदघाटन आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळेस ते बोलत होते.यावेळी अध्यक्षा प्रीती सप्रू, ट्रस्टच्या सचिव अभिनेत्री संभावना सेठ, संस्थेचे खजिनदार अभिनेते दीपक पराशर, बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव, मनोज जोशी, मुकेश ऋषी, आयुब खान, अभिनेत्री कुनिका आणि सिने व टीव्ही क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित होते.
