कोल्हापूर:पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावर रोज शेकडो बसेस धावतात. मात्र राज्य शासनाच्या आरटीओ विभागाकडून किरकोळ त्रुटी दाखवून रोज हजारो रुपयांची ई चलनं पाठवली जात आहेत. त्यातून आजपर्यंत कोटयवधी रुपयांची लूट या विभागानं केली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणार्या बस चालकांची अशा प्रकारे आर्थिक लूट करण्याचा परिवहन विभागाला कोणताही अधिकार नाही. या मार्गावर बसेसना २००० रुपये आणि ४००० रुपयांची दंड आकारणी ई चलनाव्दारे केली जाते. काही ठिकाणी ताशी ३५ किलोमीटर आणि ४० किलोमीटरपेक्षा जास्त वेग असेल तर. ४००० रुपयांची दंड आकारणी केली जाते. तर टोल नाक्यावर मार्ग बदलला तर २००० रुपयांची दंड आकारणी केली जाते. जी सर्व बस व्यावसायिकावर अन्याय करणारी आहे. अशा प्रकारे दररोज जी बस द्रुतगती महामार्गावरून जाते. त्या बसवर वार्षिक साधारणपणे ५ लाख रुपयांची दंड आकारणी झालेली आहे. त्यामुळे सर्व बसेस चालक, व्यावसायिक प्रचंड अडचणीत सापडले असून, या आर्थिक लुटीसाठी वारंवार शासनाकडे आणि परिवहन विभागाकडे तसंच लोकप्रतिनिधींकडे दाद मागूनही न्याय मिळत नाही. बहुतांशवेळा बस चालकाच्या चुकीसाठी बसच्या मालकाला जबाबदार धरले जाते. महिनोंमहिने ई चलनाचा भार सोसून बसेस चालक वैतागले आहेत. तसंच बसेसवरचा दंड भरणेसाठी आर.टी.ओ. कडून बसेस ब्लॅकलिस्ट करणेची प्रक्रिया सुरू करणेत आली आहे. लाखो रुपयांचा दंड भरण्याची बसेस चालकांची ऐपत नाही. त्यामुळे बस व्यावसायिक भिकेला लागून वेळप्रसंगी आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे या मार्गावर धावणार्या सर्व बसेसवरील दंड आरटीओ प्रशासनाने माफ करावा आणि इथून पुढे कोणत्याही बसेसवर ई चलन कारवाई करू नये, अशी आमची मागणी आहे. जर मागणीबाबत गांभीर्यानं विचार झाला नाही, तर सोमवार ११ मे पासून आरटीओ ऑफिस समोर आमरण उपोषणाला सुरवात करू, असा इशारा नाकोडा ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर प्रदिप राठोड यांनी दिला आहे. पत्रकार परिषेदला प्रवासी बस वाहतूकदार उपस्थित होते
