पुणे : दुर्गराज रायगड हा केवळ गड नसून स्वराज्याच्या अस्मितेचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे ‘माझा गड, माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक शिवभक्ताने रायगड स्वच्छ, प्लास्टिकमुक्त आणि शिस्तबद्ध ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा लौकिक आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत असून हा लोकोत्सव अधिक भव्य करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.दि. ५ व ६ जूनला दुर्गराज रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय नियोजन बैठकीत ते बोलत होते. ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरिअल ट्रस्ट येथे ही बैठक पार पडली.सोहळ्याच्या तयारीबाबत माहिती देताना संभाजीराजे छत्रपती यांनी “प्लास्टिकमुक्त रायगड” ही यंदाच्या उत्सवाची प्रमुख संकल्पना असल्याचे स्पष्ट केले. रायगडावर प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा नेणे टाळावे, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा आणि गडाचे पावित्र्य जपावे, असे आवाहन त्यांनी शिवभक्तांना केले.येत्या आठवड्यात रायगडावर लाईट अॅंड साऊंड शो सुरू होणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे आधुनिक तंत्रज्ञानातून दर्शन घडवणारा हा उपक्रम शिवभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी चाळीस समित्यांच्या माध्यमातून शिवभक्तांसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांचा आढावा घेतला. वाहनतळ, पाणी, अन्नछत्र, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, वाहतूक, शौचालये आणि नियंत्रण कक्ष अशा विविध सेवांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.बैठकीस युवराज शहाजीराजे यांची उपस्थिती होती. राज्यभरातील समन्वयक, विविध समित्यांचे पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त उपस्थित राहणार असल्याने व्यापक नियोजन करण्यात येत आहे.
या प्रसंगी कार्याध्यक्ष हेमंत साळोखे संजय पवार , सचिव अमर पाटील, उपाध्यक्ष चैत्राली कारेकर, प्रशांत दरेकर अतुल चव्हाण, केतन पुरी, पोलीस उपाधीक्षक शंकर काळे, प्रवीण पोवार, महादेव देवरसकर, वर्षा चासकर, विश्वास निंबाळकर, विठ्ठल बाराते, दत्ता वाघ, अभिजीत राऊत, बापू कुटवळ, आझाद नायकवडी, यशवंत गोसावी, धनंजय जाधव, विक्रमसिंह राजपुरोहित, मालोजी जगदाळे, राहुल शिंदे, विकास देवाळे, महेश भुजबळ उपस्थित होते.
समितीचे कार्याध्यक्ष सुखदेव गिरी यांनी स्वागत केले. अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सत्यजित भोसले यांनी आभार मानले.
