द कोल्हापुरी या एक हजार वर्षे जुन्या कलेचा सांस्कृतिक वारसा जगासमोर आणणाऱ्या पुस्तकाचा जागतिक स्तरावर सन्मान

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एक शानदार समारंभामध्ये कोल्हापूर मधील कलापुरी आणि व्हि.एम.एल. ह्या जागतिक मेडिया एजन्सीच्या संयुक्त प्रयत्नांनी निर्मिलेल्या “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास एकूण ११ “क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स” प्राप्त झाले आहेत जाहीरात व क्रिएटीव्हिटीच्या क्षेत्रात क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स हा एक जागतिक स्तरावरचा सन्मान समजला जातो. “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकाने ११ पुरस्कार प्राप्त करून कोल्हापुरी चप्पल व कोल्हापूरचा नावलौकिक सातासमुद्रापार पोचवला. क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्समधील सर्वोच्च अवॉर्ड “ब्लॅक एलिफंट” हा पुरस्कार देखील कलापुरीने प्राप्त केला. असल्याची माहिती प्रा.श्रीधर वैद्य,संस्थापक कलापूरी सौ. अपर्णा चव्हाण,श्री. आतीष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पत्रकार परिषदेला सौ.अमृता काळे उपस्थित होत्या.
याची अधिक माहिती देताना सौ.चव्हाण यांनी सन्मान कार्यक्रमास प्रसिध्द लेखक व प्रसारभारतीचे अध्यक्ष श्री. प्रसून जोशी, क्युरियसचे राजेश केजरीवाल, व्हि.एम.एलच्या सि.ई.ओ. बबिता बरूआ, व्हि.एम.एलचे क्रिएटिव्ह ग्रुपचे प्रमुख कल्पेश पाटणकर व क्रिएटिव्ह मेडिया क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक गौरी शिंदे, हर्षद राजाध्यक्ष, राहुल मॅथ्यू ह्या सारख्या दिग्गजांनी ज्यूरी म्हणून काम पहिले.
क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स व्यतिरिक्त “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास तीन क्लिओ अवॉर्ड्स (कास्य पदक) प्राप्त झाली आहेत. १९५९ मध्ये स्थापन झालेले क्लियो अवॉर्ड्स हे जाहिरात, डिझाईन आणि संवाद क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी एक मापदंड आहेत. क्लियो अवॉर्ड्ससाठी दरवर्षी जगभरातील आघाडीच्या सर्जनशील व्यावसायिकांनी सादर केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाते आणि उद्योगासाठी नवीन मानके प्रस्थापित करणाऱ्या कामाची क्लियो अवॉर्ड्ससाठी निवड केली जाते. जागतिक पातळीवरील नामांकित अँबीज अवॉर्ड्समध्ये “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास विविध प्रकारांमध्ये गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉंझ पदक प्राप्त झाले आहे. त्याच प्रमाणे द वन शो यांनी देखील “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास पुरस्कार देवून गौरविले आहे.
कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरच्या वैभवशाली कलासंस्कृतीचे प्रतीक आहे. कोल्हापुरी चप्पल ही पारंपरिक कला, कौशल्य आणि अप्रतिम कारागिरीचे प्रतीक आहे. जागतिक फॅशन उद्योगाने अनेकदा कोल्हापुरी चप्पलच्या कौशल्यपूर्ण डिझाईनचे कौतुक केले आहे, परंतु त्याचे मूळ आणि त्यामागील लोकांकडे दुर्लक्ष केले आहे. पिढ्यानुपिढ्या कोल्हापुरी चप्पलची कला जोपासणाऱ्या कारागिराना त्यांच्या कलेचे श्रेय देण्याचे काम “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकाने केले आहे. मिलान फॅशन वीक २०२५ मध्ये, प्राडाने कोल्हापुरी चपलांशी अगदी मिळत्याजुळत्या असलेल्या चपला त्यांच्या मूळ उत्पत्तीचे किंवा निर्मात्यांचे श्रेय न देता प्रदर्शित केल्या, ज्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली. याचा फक्त निषेध नोंदवण्याऐवजी कोल्हापुरी चप्पलसाठी जी. आय. मार्क प्राप्त असणाऱ्या ‘कलापुरी’ने एक वेगळा मार्ग निवडला. कलापुरीने ‘द कोल्हापुरी’ हे हाताने बनवलेले पुस्तक तयार केले, ज्यामध्ये या कलेचा हजार वर्षांचा प्रवास आणि त्यामागील कारागिरांची माहिती दस्तऐवजीकृत केली आहे.
सौ. अपर्णा चव्हाण व आतिश चव्हाण यांनी सुरु केलेल्या व केवळ हस्तकला क्षेत्रासाठी समर्पित कलापुरी ह्या कोल्हापुरातील स्टार्टअपने अल्पावधीमध्येच देश विदेशात नावलौकिक कमावला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणाच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या कलापुरीच्या माध्यमातून आज ५०० हून अधिक ग्रामीण महिलांना रोजगार प्राप्त झालेला आहे. ग्रामीण कारागीरांच्या हस्तकौशाल्यातून साकारलेल्या कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक कोल्हापुरी ज्वेलरी व हँडमेड बास्केट ह्या सारख्या उत्पादनांना कलापुरीच्या माध्यमातून आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. ग्रामिण भागातील करगिरांना विशेषत: महिला कारागिरांना कौशल्याधारीत रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण देणे, ह्या कारागिराना आवश्यक ती सर्व टुल्स व कच्चा माल उपलब्ध करून देणे, कारागिरांनी बविलेल्या हस्तकलेच्या सर्व वस्तूंना देशात व विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देणे व ह्या माध्यमातून स्वयंपूर्ण खेडी व ग्रामस्वराज्य हे महात्मा गांधींचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे कार्य गेल्या १० वर्षांहून अधिक काळ कलापुरी करीत आहे.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!