दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून रोजी रंगणार ‘शिवराज्याभिषेक सोहळा’

 

कोल्हापूर : दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी झालेला ‘राज्याभिषेक’ हा शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा सुवर्णपान आहे. यवनी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्रभूमीला स्वातंत्र्याचा हुंकार देणारा आणि शिवरायांच्या प्रेरणेने मर्द मराठ्यांच्या तलवारी याच मातीत उजळून सार्वभौम राज्य स्थापन करणारा हा अभूतपूर्व क्षण होता. हजारो मावळ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या बलिदानातून पावन झालेल्या याच दुर्गराज रायगडावर मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या राज्याभिषेकाची द्वाही दळमळत्या दाहिदिशा फिरली होती. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहावी, याच हेतूने प्रतिवर्षी ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
याच ऐतिहासिक परंपरेला जपत, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर ५ आणि ६ जून रोजी ‘शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन ६ जून लोकोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. हा सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून, ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा..’ आणि ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सविस्तर रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
शुक्रवार दि. ५ जून पहिला दिवशी
दुपारी ३:३० वा. पाचाड येथील राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस अभिवादन करून सोहळ्यास प्रारंभ होईल.
दुपारी ४:०० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे नाणे दरवाजा येथे भव्य स्वागत व शिवभक्तांसह पायी गड चढण्यास प्रारंभ.
दुपारी ४:१५ वा. नगारखाना येथे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीत गडपूजन.
दुपारी ४:३० वा. युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते ‘धार तलवारीची.. युद्धकला महाराष्ट्राची…’ या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकास होळीचा माळ येथे प्रारंभ.
सायंकाळी ७ वा. होळीचा माळ येथे ढोलवादन, लेझीम प्रात्यक्षिके व वारकरी संप्रदायाकडून टाळ-मृदंगाचा गजर.
रात्री ८ वा. – राजसदर येथे ‘जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा…’ हा शाहिरी कार्यक्रम.
रात्री ९ वा. शिरकाई मंदिर येथे गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ.
रात्री ९:३० वा. जगदीश्वर मंदिर येथे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन.

शनिवार, दि. ६ जून रोजी
सकाळी ७ वा. नगारखाना येथे युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन व ध्वजारोहण.
सकाळी ७:३० वा. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम.सकाळी ९:३० वा. श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदर येथे आगमन.
सकाळी ९:५० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरवर आगमन.सकाळी १०:०० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सवमूर्तीस अभिषेक, तसेच राजसदरवरील सिंहासनाढूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक होईल.
सकाळी १०:२० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना जाहीर संबोधन.
सकाळी १०:३० वा. ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक’ पालखी सोहळ्यास प्रारंभ.सकाळी ११ ते दुपारी १२ वा. श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे जगदीश्वर मंदिर येथे आगमन.दुपारी १२:१५ वा. जगदीश्वर मंदिर येथे युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायाला पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान.दुपारी १२:२५ वा. श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन करून ऐतिहासिक सोहळ्याची सांगता होईल.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने या ऐतिहासिक लोकोत्सवात सर्व शिवभक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन आज समितीने पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक् आणि सचिव संदीप खांडेकर, सुखदेव गिरी, अमर पाटील, शाहीर दिलीप सावंत यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!