
शेतकऱ्याच्या प्रश्नांवर परखड भाष्य करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘उलट-सुलट’ या नाटकाला बळीराजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतं आहे.
काल सोलापूर मधल्या बार्शी इथे भगवंत महोत्सवात या नाटकाला दहा ते बारा हजार प्रेक्षकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला.शेतकरी प्रश्नावर विचार करायला लावणारे हे नाटक हजारो बार्शीकरांनी शांतपणे पाहत वेगळीच शिस्त दाखवून दिली. ऐश्वर्या आणि सुयोग निर्मित किरण माने लिखित कुमार सोहोनी दिग्दर्शित आणि मकरंद अनासपुरे अभिनित या नाटकाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या व्यथेला वाचा फोडली अशी सार्वत्रिक भावना प्रेक्षकांच्या मनात आहे आणि त्याचमुळे केवळ माऊथ पब्लिसिटीवर या नाटकाला राज्याच्या कानाकोपऱ्यात हजारोंची गर्दी जमत आहे.
नाटकातल्या प्रसंगांशी समरसून जात हेलावून जाणारा प्रेक्षक वर्ग हे चित्र गावोगाव दिसत आहे. हे नाटक या प्रेक्षकांपर्यंत पोहचावे,यासाठी संपूर्ण राज्यातल्या ग्रामीण भागांचे व्यापक दोरे निर्मात्यांनी आखले आहेत.विशेष म्हणजे ग्रामीण भागांसोबत शहरी भागातही या नाटकाला हळूहळू उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नाना पाटेकर, उदय निरगुडकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये ‘उलट सुलट’ नाटकाचा सुवर्ण महोत्सवी ५० वा प्रयोग मुंबईत पार पडला त्यावेळी मान्यवरांनी केलेलं कौतुक या नाटकाला सातासमुद्रापार घेऊन गेले असून १० मेला नाटकाचा मस्कत इथे प्रयोग होणार आहे.
रसिकप्रेक्षकांची गर्दी कशाला म्हणतात ते “उलट सुलट” नाटकाला पंढरपुर- बार्शी येथे झालेल्या रसिकप्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीने कळेल.ज्या मायबाप अन्नदात्या प्रेक्षकांसाठी ही कलाकृती निर्माण केली,त्यांचा हां प्रतिसाद भारावून टाकणारा असून निर्माता म्हणून बळ देणारा आहे. मकरंद अनासपुरे यांची लोकप्रियता आणि संपुर्ण टीमच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे,अशी भावपूर्ण प्रतिक्रिया निर्माते राजेश पाटील यांनी यानिमिताने व्यक्त केली.लवकरच हे नाटक अमृतमहोत्सवी प्रयोग करेल.
Leave a Reply