
कोल्हापूर: मुस्लिम समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेचा नियोजन केंद्र आणि राज्य हज समितीकडून सुरू आहे. अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयांतर्गत हज कमिटी ऑफ इंडिया ही सर्वोच्च संस्था या यात्रेचं संपूर्ण नियोजन करते. महाराष्ट्र राज्याची हज कमिटी ही महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी नियोजन करत असते. यामध्ये यात्रेकरूंची नोंदणी करणे त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे त्याचबरोबर सौदी अरेबिया इथे यात्रेकरूंना राहण्यास सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षी ७० वर्षावरील हज यात्रेकरूंसाठी कोणत्याही प्रकारची सोडत असणार नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष अधिकारी इम्तियाज काझी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाराष्ट्र राज्यातून हाज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मुंबई ,औरंगाबाद आणि नागपूर येथे केंद्र बनवले आहेत. कोल्हापुरातील हज यात्रेकरू हे मुंबई केंद्रामार्फत हाजला जातील. या सेंटरकडे नोंद झालेल्या यात्रेकरूंना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. ह्यासाठी पहिल्यांदा जाणाऱ्या यात्रेकरूला कोणताही कर सौदी अरेबिया सरकारला द्यावा लागत नाही. पण आधी ही यात्रा जर करुन आला असाल तर सौदी अरेबिया सरकारला दोन हजाररियान इतका कर भरावा लागणार आहे. हज यात्रेला जाण्यासाठी सरकारने सबसिडी जरी बंद केली असली तरी मुंबई केंद्राच्यावतीने जाणाऱ्या यात्रेकरूंना एकोणसाठ हजार दोनशे रुपये इतके विमान भाडे आकारले जाणार आहे. पर्यायाने कोल्हापुरातील यात्रेकरू मुंबई केंद्राकडून जात असल्यामुळे त्यांना सर्वात कमी विमान भाडे आकारला जाणार आहे, असेही काझी यांनी सांगितले.१९९२ पूर्वी हज यात्रेला जाणाऱ्यांची संख्या मोठी होती यामुळे सागरी मार्गाने हज यात्रा करता येत होती पण १९९२ पासून सागरी मार्गाने हज यात्रा बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तसेच जर महिलांना हज यात्रेला जायचे असेल तर चार जणांच्या समूह करून या महिला मेहरम शिवाय हज यात्रा करु शकतात हाही निर्णय या वर्षी नवीन करण्यात आला. हज यात्रेकरूंना आपले ओळखपत्र जवळ ठेवावे तसेच सुरक्षिततेच्या बाबतीत स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे असे आव्हानही काझी यांनी यावेळी केले. कोल्हापुरात यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हज यात्रेला जाण्याची संधी मिळालेल्या सर्व यात्रेकरूंनी याचा लाभ घेतला. यावेळी राज्य हज कमिटीचे खजानिस जुबेर अहमद, अब्बास शेख ,कोल्हापूर कमिटीचे जिल्हा समन्वयक हाजी इकबाल देसाई ,मुस्लिम बोर्डिंगच्या संचालक जहांगीर सलीम बागवान यांच्यासह सर्व यात्रेकरू व कमिटी पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply