
पुुुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षांतर्गत नियुक्त्या आज पुणे येथे जाहीर करण्यात आल्या. यावेळी आ. जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द केल्याबद्दल आ. जयंत पाटील यांनी आदरणीय शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. पुण्यात झालेल्या बैठकीत पक्षाच्या नवीन कर्यकारणी सदस्यांची घोषणा झाली त्यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. १९९९ साली आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर अर्थमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. त्यांनी स्वतःचा मुलगा म्हणून, स्वतःच्या घरातला माणूस म्हणून माझ्यावर जबाबदाऱ्या टाकल्या. आजही जी जबाबदारी त्यांनी मला दिली आहे त्याचे गांभीर्य मला समजते. ते समजून त्याच पद्धतीने मी काम करेन असे आश्वासन देत जयंत पाटील यांनी पदभार स्वीकारला.पवार साहेबांचं सरकार होतं तेव्हा समाजातील प्रत्येक घटकाला आपलेपणाची जाणीव होती. आज महाराष्ट्र अनेक संकटांत वेढला गेल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र अधोगतीकडे गेला आहे. राज्यकर्त्यांची कातडी गेंड्याची आहे. यांच्या घरासमोर जाऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत पण सरकारला काही पाझर फुटत नाही. या सरकारने केलेल्या चुकांमुळे महाराष्ट्र देशोधडीला लागला असल्याचे कटु सत्य त्यांनी बोलून दाखविले.लोकांना हे सरकार आपलंस वाटतच नाही आहे. महाराष्ट्रात बलात्कार, हत्या, दरोडे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. सरकार या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक गोष्टीत ट्विट करतात. मात्र दादरी येथील घटना असो, रोहित वेमुलाची आत्महत्या असो अथवा आशिफा प्रकरण त्यांनी मौन पत्करले. सरकारने तरुणांचाही मोठा अपमान केला आहे. हाच तरुण या सरकारला घरचा रस्ता दाखवणार असल्याची चीड त्यांनी व्यक्त केली. या सरकारला घरी बसवण्याची ताकद फक्त पवार साहेबांमध्येच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.येणाऱ्या काळात आम्ही समविचारी पक्षांसोबत जाण्याच्या विचार करणार असून याचा अर्थ आम्ही कमकुवत आहोत असं नसल्याचे ते म्हणाले. समविचारी लोकांनी एकत्र लढा द्यावा ही त्या मागची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षात निरंतर सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ताकद कमी आहे तिथे ताकद द्यावी लागेल. ज्यांचा जनमानसात वावर आहे अशांना संधी द्यावी लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांची साथ मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे जर झालं तरच लोकांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाव गोंदले जाईल असे ते म्हणाले.आपले विचार योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी पक्षात परफॉर्मन्स काऊंट झाला पाहिजे, बूथ कमिट्यांवर लक्ष असले पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच संघटन भक्कम होण्यासाठी ही यंत्रणा चार महिन्यात उभी करण्याची तयारी त्यांनी दाखविली. राष्ट्रवादीत कोणताच गट नाही. आम्ही सगळे शरद पवार नावाच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत, असे म्हणत त्यांनी येणाऱ्या काळात पक्षाची जबाबदारी सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतल्याचे संकेत दिले.
Leave a Reply