
कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आजपासून ऑनलाईन 7/12 देण्याचा जगाच्या इतिहासातील क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतला असून 40 हजार गावातील 4 लाख शेतकऱ्यांचे 7/12 ऑनलाईन झाले असून आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घरबसल्या लॅपटॉपवर ऑनलाईन 7/12 उपलब्ध होईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतना केली.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शाहु स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर स्वाती यवलुजे, विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत गायन व परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनात पोलीस दल, गृहरक्षक दल, वनरक्षक दल, बँड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, दंगल नियंत्रण पथक, सीसीसटीव्ही सर्व्हेलन्स व्हॅन, मोबाईल फॉरेसिक लॅब पथक, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, अग्नीशमन पथक, निर्भया पथक, 108 पथक आणि मुद्रा योजनेचा चित्ररथ अशा विविध विभागांची पथके सहभागी झाली होती. याबरोबरच शालेय मुला-मुलींनी समुहगान सादर केले.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान केले असून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. याबरोबरच महाराष्ट्राच्या भुमिने छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्रवीर सावरकर, लोकमान्य बाल गंगाधर टिळक, आगरकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले असे थोर समाज सुधारक जन्माला दिले. महाराष्ट्राला आकार देण्याचं काम स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी केले अशा या संमृध्द, संपन्न महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकास करण्याचं काम गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने हाती घेतले असून यापुढील काळातही विकासाचे अनेकविध प्रकल्प राबवून महाराष्ट्र देशातील नंबर एकचे राज्य बनविण्याच्या दृष्टीने शासनाची वाटचाल सुरु आहे. सर्व क्षेत्रात महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य बनविण्याच्या प्रयत्नात राज्यातील जनतेनेही शासनास साथ द्यावी. जाती, पंथ, भाषा विसरुन भारतीय आहोत याचा अभिमान बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आजच्या महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला ऑनलाईन 7/12 देण्याचा शुभारंभ मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असून आतापर्यंत 40 हजार गावातील 7/12 ऑनलाईन झाले आहेत. उर्वरित गावातील शेतकऱ्यांचे 7/12 डिजिटल स्वाक्षरीसह येत्या महिन्याभरात पूर्ण करुन शेतकऱ्यांना आपल्या घरात लॅपटॉपद्वारे ऑनलाईन 7/12 उपलब्ध होईल, अशी क्रांतीकारी व्यवस्था शासनाने केली असल्याचेही महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रात रस्त्यांचं जाळ निर्माण करण्याचं काम शासनाने हाती घेतले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासनाने मुंबईचा मेट्रो प्रकल्प पूर्ण केला असून पुणे आणि नागपूर मेट्रोचे कामही पूर्ण होत आहे. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून दळण वळणाला गती दिली आहे. राज्यात रस्त्याचं जाळ निर्माण करण्याच्या हेतुने 5 हजार किलो मीटरचे राष्ट्रीय महामार्गाचे चार पदरी रस्ते 22 हजार किलो मीटरचे केले आहेत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे 3 पदरी 10 हजार किलो मीटरचे रस्ते करण्याबरोबरच उर्वरित रस्ते दर्जेदार बनविले जातील, असे एकूण 89 हजार किलो मीटरचे रस्ते येत्या दोन वर्षात बनवून राज्याच्या दळण वळणाला गती आणि दिशा दिली जाईल.
राज्य शासनाने 34 हजार कोटीची क्रांतीकारी कर्जमाफी योजना राबवून राज्यातील 50 लाखावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानही दिले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 86 हजार शेतकऱ्यांना 361 कोटीची कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर व्याज अनुदान दिले असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांची ईबीसी सवलतीसाठीची उत्पन्न मर्यादा 1 लाखावरुन 8 लाख केली आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांची निम्मी फी शासनामार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे. 10 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या तरुणांचे 6 लाखापर्यंतचे व्याज शासन देणार आहे. तसेच 3 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मोफत देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.
Leave a Reply