
कोल्हापूर : महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यात बचत गट चळवळींचे मोठे योगदान असून महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून नवनव्या उद्योग व्यवसायाव्दारे स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि करवीर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साईक्स एक्सटेंशन परिसरातील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात ग्रामस्वराज्य, आजिविका व कौशल्य विकास दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक बोलत होते. समारंभास आमदार अमल महाडिक, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिश जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, सोमनाथ रसाळ, अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषा कुंभार, गटविकास अधिकारी शरद भोसले, देवराज बारदेसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील महिला बचतगटांची चळवळ अधिक सक्षम करण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून खासदार धनंजय महाडिक म्हणाले, बचतगटांच्या माध्यमातून महिला संघटन आणि महिला सबलीकरणाचे काम प्रभावीपणे होत आहे. महिलांनी यापुढील काळात शासनाच्या विविध योजना आत्मसात करून त्यानुसार विविध व्यवसाय उद्योगाव्दारे आर्थिक परिवर्तनाचा मार्ग स्विकारावा. जिल्ह्यातील बचतगटांना गेल्या तीन वर्षात् विविध व्यवसाय – उद्योगासाठी सुमारे 125 कोटी रूपये देण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात घरकुल उभारणीचा प्रभावी कार्यक्रम राबविला असून गेल्या 3 वर्षात 9 हजार 182 घरकुले पात्र लाभार्थिंना उपलब्ध करून देण्यात आली आाहेत. गोर-गरीब तसेच सामान्य जनतेला घरकुले उपलब्ध करून देण्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे काम राज्यात अग्रेसर असल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी समाधान व्यक्त केले. यापुढील काळात गोर-गरीब जनेतेला घरकुले उपलब्ध करून देण्याबाबत यंत्रणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Leave a Reply