
कोल्हापूर : एकाच वेळी चार महत्त्वपूर्ण अवयवांचे दान आणि शस्त्रक्रिया करण्याची पहिलीच घटना आज (शनिवार) कोल्हापुरात घडली आहे. यामध्ये हृदय, दोन किडनी आणि लिव्हर या अवयवांचा समावेश आहे. अमर पांडुरंग पाटील (वय ३१, रा. निगवे खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या ‘ब्रेन डेड’ झालेल्या तरुणाचे चार महत्त्वपूर्ण अवयव दान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेऊन समाजासमोर एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हे चारही अवयव वेगवेगळ्या शहरातील रुग्णांपर्यंत त्वरित पोहोचविण्यासाठी कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच ‘ग्रीन कॉरिडॉर’चा वापर करण्यात आला. कोल्हापुरातील अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अवयवदानाच्या शस्त्रक्रियेची ही दुसरी वेळ असून किडनी प्रत्यारोपणाची ही तिसरी शस्त्रक्रिया पार पडली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे राज्यातील हे चौथे हॉस्पिटल ठरले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अमरचा ३० एप्रिल रोजी येवती फाटा येथे टेम्पोच्या धडकेत अपघात झाला होता. त्यानंतर त्याला तत्काळ सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अमरची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अॅस्टर आधार या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारानंतर अमरचा मेंदू मृत पावला असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर डॉक्टरांनी ही गोष्ट अमरच्या नातेवाईकांना सांगितली. सर्व कुटुंबीयांची इच्छा होती की अमर अवयव रुपी सदैव जिवंत राहावा, ज्याला ज्यांना कोणाला हे अवयव मिळणार आहेत त्यांचे आशीर्वाद घरच्यांना आणि मुलांना मिळावे या इच्छेने हृदय, किडनी आणि लिव्हर हे अवयव दान करण्याची तयारी दर्शवली.
अॅस्टर आधार येथील एका रुग्णाला किडनीची आवश्यकता होती व त्यांचे रक्ताचे नमुने सुद्धा जुळले. तर दुसरी किडनी पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील एका रुग्णासाठी पाठविण्यात आली. त्याचप्रमाणे पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथील एका रुग्णाला लिव्हरची आवश्यकता होती, तर मुलुंड, मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलमधल्या एका रुग्णाला हृदयाची आवश्यकता होती. त्याप्रमाणे कायदेशीर बाबी पूर्ण करून त्याप्रमाणे त्या हॉस्पिटलकडून त्यांची टीम अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आली व अॅस्टर आधार हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमच्या मदतीने सर्व अवयव व्यवस्थितरित्या काढून त्यांचे हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे सुपूर्त करण्यात आले. या सर्व प्रक्रियेमध्ये अॅस्टर सी.एम.आय., बेंगलोरचे मेडिकल पथकाचे सहकार्य लाभले.
महत्वाचे म्हणजे कोल्हापूर पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांचे उल्लेखनीय नियोजन या वेळी पाहायला मिळाले. मुंबई येथील हॉस्पिटलमधल्या एका रुग्णाला हृदयाची आवश्यकता होती. त्यानुसार हे हृदय वेळेत मुंबईपर्यंत नेण्यासाठी एअर अँब्युलन्सचा वापर करण्यात आला. यासाठी अॅस्टर आधार हॉस्पिटलपासून कोल्हापूर विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून अवघ्या ६.३२ मिनिटात पोहोचवण्यात आले. दुसरे अवयव अँब्युलन्सने पोहोचवायचे होते. त्यासाठी अॅस्टर आधार ते सांगली बॉर्डर हा ३७ किलोमीटरचा प्रवास सुद्धा अवघ्या २७ मिनिटात पार केला. यासाठी वाहतूक शाखेचे प्रशंसनीय कार्य यावेळी पाहायला मिळाले.
अलीकडच्या काळात अवयवदानाच्या बाबतीत कमालीची जागृती झाली असून अवयवदानच नव्हे; तर देहदान करणार्यांच्या संख्येतही सातत्याने मोठी वाढ होत आहे. परंतु मागणीच्या तुलनेत अवयवांची संख्या अत्यंत तोकडी आहे. अमरच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या अवयवदानाच्या निर्णयानंतर नक्कीच अवयव दानाबद्द्दल अधिक जागृती होईल.
Leave a Reply