
कोल्हापूर : सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात, पुष्प पाकळ्यारुपी अक्षतांच्या सुगंधी वर्षावात 62 वधु-वरांना मिळाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचे शुभाशिर्वाद ! ना फटाक्यांचा आवाज, ना डॉल्बीचा दणदणाट, सामाजिक बांधिलकीतून समाजात नवा विचार रुजवू पाहणाऱ्या या पर्यावरणपूरक लग्न सोहळ्यात वधु-वरांसह नातेवाईकांनी श्रीखंड पुरीच्या जेवणाचा अस्वादही घेतला.
भव्य मंडप, वधु-वरांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म अशा मंगलमय वातावरणात आजचा सामुदायिक विवाह सोहळा संबंधित जोडप्यांच्या धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे पण पर्यावरणपूरक पध्दतीने उत्साही वातावरणात पार पडला. आजच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण 62 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले. यामध्ये हिंदू पध्दतीचे 48, बौध्द 11, मुस्लिम 1, ख्रिचन 1 आणि सत्य शोधक पध्दतीच्या एका विवाहाचा समावेश होता.
धर्मादाय आयुक्त कार्यालय व सामुदायिक विवाह समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माच्या 62 जोडप्यांचा सामुदायिक विवाह आज पेटाळा मैदान येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सामुदायीक विवाह सोहळ्यातील वधु-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी आमदार अमल महाडिक, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, सहा. धर्मादाय आयुक्त राहूल चव्हाण, श्री. वाबळे, सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
4500 रुपयांच्या ठेवीद्वारे पालकमंत्र्यांनी दिले वधु-वरांना विमा सुरक्षा कवच
सामुदायीक विवाह सोहळ्यातील वधु वरांना शुभाशिर्वाद देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजच्या सामुदायीक विवाह सोहळ्यातील 62 वधु-वरांना प्रत्येकी 4500 रुपयांची ठेव पावती देण्यात येणार असून या ठेवीच्या व्याजातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचे विमा सुरक्षा कवच वधु-वरांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या ठेवीच्या व्याजातून वधु-वरांचे आयुष्यभराची वर्गणी आपोआप बँकेत जमा होईल आणि या दोन योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने वधु-वरांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सामुदायीक विवाह सोहळ्यातील वधु-वरांचे जीवन सुखी, आनंदी आणि उत्साहपूर्ण राहो अशा शुभेच्छा देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या इतिहासातील सर्वात मोठा हा पहिलाच सामुदायिक विवाह सोहळा असून धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि सामुदायिक विवाह सोहळा समितीने कोल्हापूरच्या मातीत सामुदायीक विवाह सोहळ्याची संकल्पना रुजविण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न कौतुकास्पद आहे. अशा सामुदायीक विवाह सोहळ्यामुळे एैपत नसतानाही मुलीचे लग्न कर्ज काढून थाटामाठात करण्याच्या प्रथेला बगल मिळेल. लग्न समारंभासाठी होणारा अवास्तव खर्च वाचेल, यामुळे यापुढील काळात अशा प्रकारचे सामुदायीक विवाह सोहळे व्हावेत यासाठी या समितीच्या वतीने आवश्यक ती मदत केली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आजचा सामुदायीक विवाह सोहळा आज सकाळी 11.54 मिनिटींच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला. सकाळी 9 वाजता वधु-वरांचे उत्साही वातावरणात स्वागत करुन नाष्टा देण्यात आला. यानंतर जागो हिंदुस्थानी हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. सकाळी वरांना समितीच्या वतीने संसार सट देण्यात आला. यामध्ये एक पिंप, 6 ताटे, 6 वाट्या, 6 चंमचे, 6 फुलपात्रे, 2 तांबे, 1 बाळकृष्ण, 1 गादी, मणिमंगलसुत्र, नाकातील नतनी, जोडवी देण्यात आली. तसेच दोन महिने पुरेल एवढे रेशन देण्यात आले यामध्ये आटा, तांदुळ, साखर, तुरडाळ, चहा यांचा समावेश होता. लग्नानंतर वधु-वरांसह नातेवाईक अशा 5 हजार लोकांना श्रीखंड पुरीचे गोड जेवण देण्यात आले. वधु-वरांना मुहुर्तमेढीसाठी अंब्याचे रोप देण्यात आले असून त्यांनी ते जोपासावे, अशी अपेक्षा समितीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी बोलताना सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे म्हणाले, हा सामुदायीक विवाह सोहळा संबंधित जोडप्यांच्या धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे संपन्न झाला. कोल्हापूरकरांनी या विवाह सोहळ्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल तसेच विविध संस्थांनी भरघोस मदत दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आजच्या सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी 200 X 150 फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला, यामध्ये 24 X 48 चे स्टेज व 140 X16 फुटांचे वधु-वरांसाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता. तसेच विवाह सोहळा पाहता यावा यासाठी 6 मोठे स्क्रिन मंडपामध्ये लावण्यात आल्यामुळे नातेवाईक आणि शहर व जिल्हा वासियांना हा सामुदायीक विवाह सोहळ्याचा क्षण टिपणे सोईचे झाले.
या विवाह सोहळ्यातील वधु-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अशिष ढवळे, संदीप देसाई, नगरसेवक विजय सुर्यवंशी, मानवी विमेन्स वेलफेअर फौंडेशनचे संस्थापक अजितसिंह काटकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे नंदकुमार मराठे, ॲड. समृध्दी माने, सुप्रिया ताडे, विजयसिंह डोंगळे, उत्तम कांबळे, राजु मेवेकरी, अनंत खासबागदार, शिरीष खांडेकर, चारुदत्त जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस.पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार उत्तम दिघे यांच्यासह अनेक मान्यवर धर्मादाय आयुक्त कार्यालयचे कर्मचारी यांच्यासह विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply