
कोल्हापूर: रत्नागिरी मार्गावरील ब्रिटीशकालीन शिवाजी पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिवाजी पुलाला पर्यायी पूल असणे ही काळाची गरज आहे. गेली ३ वर्ष पर्यायी पुलाचे काम रखडले होते. पुरातत्व खात्याचे क्लीष्ट नियम, जाचक अटी यामुळे पुलाचे काम रखडले होते. याबाबत संसदेत आवाज उठविला होता. तसेच केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, पुरातत्व खात्याचे मंत्री नामदार महेश शर्मा यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ अधिकार्यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. इतकेच नव्हे, तर पुरातत्व खात्याच्या कायद्यात सुधारणा व्हावी आणि निकषांमध्ये राष्ट्रहिताच्या गरजांचा विचार होवून बदल व्हावा, यासाठी थेट पंतप्रधानांची भेट घेतली होती. मी केलेल्या पाठपुराव्यानंतर पुरातत्व खात्याने आपल्या नियमांमध्ये बदल करावा, यासाठी विशेष कायदा अस्तित्वात आला. त्याला लोकसभेत मंजुरीही मिळाली. केवळ राज्यसभेमध्ये मंजुरी बाकी होती. तथापी केंद्र सरकारने विशेष अध्यादेश काढून, शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे बांधकाम ताबडतोब सुरु व्हावे, यासाठीही माझा प्रयत्न आणि पाठपुरावा सुरु होता. तर कोल्हापुरातील सर्वपक्षीय कृती समितीनेही याबाबत निर्णायक भूमिका घेतली होती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून, शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम मार्गी लागले आहे. हा माझ्या पाठपुराव्याचा आणि लोकशक्तीचा विजय आहे. मात्र पुलाच्या बांधकामाच्या दर्जाविषयी आणि वेळेत काम पूर्ण होण्याविषयी माझे लक्ष असेल, याची ग्वाही देतो.
Leave a Reply