महिला सबलीकरणाकरिता भगिनी मंचच्यावतीने रोजगार मार्गदर्शन मेळावा 

 
कोल्हापूर : आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असताना बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून महिलांच्या सबलीकरणाद्वारे कुटुंबांचे सक्षमीकरण करणे काळाची गरज असून, येणाऱ्या काळात महिला बचत गटांना विविध शासकीय योजना, कर्ज योजनांचा लाभ देवून सक्षम करण्याची जबाबदारी शिवसेनेने स्विकारली असल्याचे, प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. आमदार मा.श्री. राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि भगिनी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ बोर्डिंग, मंगळवार पेठ महिला रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर, भगिनी मंच अध्यक्षा व प.म. देवस्थान समिती कोशाध्याक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीस युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार समाजाच्या उन्नतीसाठी काम करीत असताना महिला सबलीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या आठ वर्षापूर्वी भगिनी मंचची स्थापना करण्यात आली. दरवर्षी भगिनी मंचच्या भगिनी महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील २०० बचत गटांना मोफत स्टॉल देवून त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. प्रत्यक्ष शासकीय योजनांनाचा लाभ घेताना कागदोपत्री माहितीची कमतरता यामुळे अनेक लाभार्थी या योजनांपासून वंचित राहत आहेत. प्रशासन आणी सर्वसामान्य नागरिक लाभार्थी यांचा समन्वय साधून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा हा प्राथमिक प्रयत्न असून, या पुढील काळात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात शिबिरांचे आयोजन करून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
आजच्या महागाईच्या घडीला एका व्यक्तीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला पुढे येवून स्वयंरोजगाराद्वारे कुटुंबास हातभार लावत आहेत. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन देवून महिला सबलीकरणाद्वारे एकप्रकारे संपूर्ण कुटुंबाचे सक्षमीकरण करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली असून यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला. यासह सामाजिक, क्रीडा क्षेत्रात पुढे येणाऱ्या युवा वर्गासाठी युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर युवा सेना कार्यरत असून त्यांना पाठबळ देण्याचे काम युवा सेना करेल. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत असून, आजतागायत विविध गंभीर विकारावरील सुमारे १० हजार रुग्णावर आम्ही मोफत उपचार व शत्रक्रिया करण्यात यशस्वी ठरलो असून, आरोग्य विषयक समस्येबाबत शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजनेची सविस्तर माहिती देत त्याकरिता आवश्यक कागदपत्रांची व मिळणाऱ्या आर्थिक लाभाची माहिती दिली. यासह जिल्हा अग्रणी बँक वित्तीय सहाय्यता केंद्राचे समुपदेशक शहाजी शिंदे यांनी, मुद्रा लोन ची माहिती देत त्याची सविस्तर कार्यपद्धती सांगितली. उद्योग भवनच्या उद्योग निरीक्षक सुजाता देसाई यांनी, उद्योग भवन मार्फत चालणाऱ्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग कर्ज योजनेची सविस्तर माहिती दिली. यास जिल्हा उद्योग केंद्रामार्फत व्यवसायाकरिता मोफत प्रशिक्षण दिले जात असून त्याद्वारे व्यवसायास कर्ज उपलब्ध होण्यास सोपस्कर असल्याचे सांगितले. यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाचे उमेश लिंगनूरकर यांनी, महिला विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश सांगत शासकीय योजना आणि बचत गट यांच्यात समन्वय साधण्याचे काम महामंडळ करत असल्याचे सांगत बचत गटांनी उत्पादनाची गरज ओळखून व्यवसायास प्राधान्य देणे गरजेचे असल्याची सुचना केली. तर महापालिका कौशल्य विकास उपजिविका अभियानचे व्यवस्थापक निवास कोळी यांनी, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या माध्यमातून महिलांना नोकरी, स्वयंरोजगाराचे ३ ते ६ महिन्यांचे प्रशिक्षण देवून स्वयंरोजगारासाठी अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती दिली. यासह आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि भगिनी मंचचे काम उल्लेखनीय असून महिलांच्या सबलीकरणासाठी असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ८ रुग्णांना रु.४ लाख ७ हजार ५०० इतक्या मदत पत्राचे वाटप करण्यात आले. यासह या शिबिरास मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश निपाणीकर यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर भगिनी मंच अध्यक्षा व प.म. देवस्थान समिती कोशाध्याक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर, ऋतुराज राजेश क्षीरसागर, नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, महिला आघाडी शहर संघटक सौ. मंगलताई साळोखे, सौ. पूजा भोर, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, जेष्ठ शिवसैनिक दीपक गौड, रघुनाथ टिपुगडे, गजानन भुर्के, पद्माकर कापसे आदी मान्यवर, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!