राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी ऑक्टोंबरपासून मोफत सहली:पालकमंत्री

 

कोल्हापूर: राधानगरी तालुका निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. येथील जैवविविधता आणि सृष्टीसौंदर्य पर्यटकांना मोहित करणारे असून या ठिकाणी भरणारा काजवा महोत्सव देशभरात प्रसिध्द आहे. राधानगरी तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी ऑक्टोंबर ते मे या कालावधीत राहण्याची सुविधा, जेवण व वाहनांची सुविधा मोफत पुरवून पर्यटन घडवून आणण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे सांगून शाहूकालीन बेनझीर व्हिला या इमारतीची डागडूजी करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
जैवविविधतेने नटलेल्या निसर्ग संपन्न राधानगरीच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी राधानगरी ग्रमापंचायतीच्यावतीने पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती अभिजीत तायशेटे, तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे कलाकार हार्दिक जोशी,अक्षया देवधर, तहसिलदार शिल्पा ओसवाल, एमटीडीसीचे दिपक हर्णे, सरपंच कविता शेट्टी, दिपक शिरगांवकर, प्रकाश शिंदे, सचिन पालकर,पंचायत समितीचे उपसभापती हरीश पाटील, अरविंद हुपरीकर, सुधाकर साळूंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राधानगरी निसर्ग संपन्नतेने नटलेल आहे. या निसर्ग संपन्नतेचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातून पर्यटक यावेत. यासाठी ऑक्टोंबर ते मे या कालावधीमध्ये राहण्याची सुविधा, जेवण व वाहनांची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी पॅकेज सहलींचे आयोजन करण्यात येईल. त्यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व मदत करू. काळम्मावाडी धरणामध्ये असलेल्या शाहूकालीन बेनझीर व्हिला या वास्तूची पडझड झाली आहे. ती तात्काळ दुरूस्त करून घ्यावी व पर्यटकांना या वास्तूपर्यंत जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी असे आदेशही त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले.
राधानगरी येथे होणारा पर्यटन महोत्सव अत्यंत प्रसिध्द असल्याचे सांगून या महोत्सवासाठी येणाऱ्यांनाही सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या वर्षभरात पर्यटन वृध्दीला चालना देण्यासाठी नवदुर्गा महोत्सव, कोल्हापूर शहारातील चौक सुशोभिकरण, फ्लॉवर फेस्टीवल, आडवाटेवरच कोल्हापूर या माध्यमातून विविध उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते राधानगरी तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे व खाद्यमहोत्सवाचे उद्घाटन झाले. पर्यटकांना दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेल्या पर्यटन निवासाचे लोकार्पण झाले. निसर्गसंपन्न राधानगरी या पुस्तिकेचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी अभिजित तायशेटे यांनी राजर्षि शाहू महाराजांचे प्रेम लाभलेला तालुका आहे. त्यांनी सर्वात मोठा जलसंधारण प्रकल्प येथेच उभारला. या ठिकाणी जैवविविधतेने नटलेले अभयअरण्य असून रोजगार निर्मितीसाठी असणाऱ्या मर्यादांवर मात करून पर्यटनाच्या दृष्टिने हा तालुका विकसित व्हावा त्यासाठी वर्षा पर्यटन, काजवा महोत्सव, फुलपाखरू महोत्सव याव्दारे राधानगरी तालुक्यातील पर्यटन वैविध्य जगासमोर आणण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
यावेळी अक्षया देवधर, हार्दिक जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. सरपंच कविता शेट्टी यांनी स्वागत केले. तर एम. आर. गुरव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!