
टेलिव्हिजन आणि जाहिरात क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या’प्रोमॅक्स अॅवॉर्डस’मध्ये स्टार प्रवाहने बाजी मारली आहे.’विठूमाऊली’च्या बेस्ट मार्केटिंग कॅम्पेनसाठी रौप्यपदक आणि ‘शतदा प्रेम करावे’च्या बेस्ट प्रोमोसाठी रौप्यपदक हे दोन पुरस्कार स्टार प्रवाहने पटकावले. या पुरस्कारांच्या निमित्ताने स्टार प्रवाहचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला.’विठूमाऊली’ मालिकेसाठी स्टार प्रवाहची ‘बेस्ट नॅशनल इंटिग्रेटेड कॅम्पेन’ विभागात मराठीसह हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्सबरोबर स्पर्धा होती. मात्र, त्यात स्टार प्रवाह वाहिनी सरस ठरली. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे या मालिकेला घराघरात पोहोचवण्यासाठीटीव्ही, वृत्तपत्र, रेडिओ, सोशल मीडिया अशा नेहमीच्या माध्यमांसह कीर्तन आणि वासुदेव या लोककला, ऑगमेंटेड रिअॅलिटी या माध्यमांचाही वापर करण्यात आला होता. ऑगमेंटेड रिअॅलिटी, कीर्तन आणि वासुदेव या लोककलांचा केलेला वापर हेच विठूमाऊलीच्या कॅम्पेनचं वेगळेपण ठरलं आणि राष्ट्रीय स्तरावर सिल्व्हर अॅवॉर्ड मिळालं. या पुरस्काराच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. तर, ‘शतदा प्रेम करावे’च्या प्रोमो कॅम्पेनची स्पर्धा हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्स वगळता इतर प्रादेशिक चॅनेलबरोबर होती. त्यात ‘शतदा प्रेम करावे’ला सिल्व्हर अॅवॉर्ड मिळालं. या कॅम्पेनसाठी टीव्ही, सोशल मीडिया अशा माध्यमांचा वापर करण्यात आला होता.
‘विठूमाऊली’ आणि ‘शतदा प्रेम करावे’ या दोन्ही मालिकांना महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
Leave a Reply