
रोज-रोजच्या गडबड गोंधळाला कंटाळला असाल आणि ‘गडबड’ पाहण्याची हुक्की आली असेल तर 1 जूनला तुमच्यासाठी खास ट्रीट आहे. बिग बॉसच्या घरात बरीच गडबड करून आलेला राजेश शृंगारपूरे रुपेरी पडद्यावर अभिनयाची गडबड करायला तयार आहे. राजेश शृगांरपुरे, उषा नाडकर्णी, मोहन वाघ, नेहा गद्रे आणि विकास पाटील ही स्टारकास्ट ‘गडबड झाली’ या चित्रपटाद्वारे तुमच्या भेटीला येणार आहे. या कलाकारांची धमाल केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत आवडेल हे चित्रपट प्रदर्शनापुर्वी सांगता येणं कठीण आहे. प्रांजली फिल्म प्रोडक्शन प्रस्तूत, डॉ. जितेंद्र राठोड निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन संतराम यांनी केलं आहे. सह निर्मिती आणि संगीत दिग्दर्शन रमेश रोशन यांनी केलं आहे.
सध्या या चित्रपटाचे डान्स नंबर्स सोशल मिडियावर व्हिवर्स ना आकर्षित करत आहेत. उषा नाडकर्णींचा अभिनय प्रेक्षकांसाठी नेहमीच मेजवानी असते. त्यासोबतच मोहन वाघ यांची जुगलबंदी म्हणजे मनोरंजनाचा खास डोस. त्याचबरोबर चित्रपटातील इतर गाणीही तुम्हाला नृत्याचा ठेका धरायला लावतील. नेहा गद्रे याआधी एका मनोरंजन वाहिनीवरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिचा सालस चेहरा जसा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला तसेच तिची मोठ्या पडद्यावरील रोमँटीक एंट्री प्रेक्षकांना कशी भावते हे पाहणं औत्सुक्याच ठरेल. विकास पाटीलही छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या वेळोवेळी भेटीला आला होता. यावेळी तो चक्क बाईच्या भूमिकेतून येत असून ट्रेलरमध्ये बरीच गम्मत जम्मत करतोय. लांब केसांचा आंबाडा, डोक्यावर टिकली, केसात गजरा आणि साधारण नववधूच्या पेहरावात विकासला पाहुन अचंबित व्हायला होतं. नेहाला पाहिल्यावर ‘दिल बोले हडिप्पा’ मधील राणी मुखर्जीची आठवण येते. डोक्यावर पगडी लावलेली नेहा चित्रपटात नेमकं करतेय काय? असा प्रश्न ट्रेलर पाहताना प्रेक्षकांना पडतो. ऑफिसच्या पेहरावातील राजेश, पगडी घातलेली नेहा आणि बाईच्या वेषातील विकास या तिघांच नेमकं नातं काय आहे, हे चित्रपटात आपण शोधूच. इंग्लिश आणि मराठी भाषेचा एकत्रित तडका असलेला ‘मिश्टीक माफ सारी रे’ हा आयटम नंबर या चित्रपटात आहे. वैशाली म्हाडे आणि रागिनी कवठेकरच्या आवाज व भोजपुरी सुंदरी ग्लोरी मोहांटाच्या अदा तुम्हाला घायाळ करतील. अर्थात केवळ विनोद निर्मिती हा या चित्रपटाचा उद्देश्य नसून त्याबरोबरीने एक सद्य सामाजिक समस्येवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. सध्या मुलींनी पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढते आहे, पण हे प्रेमविवाह जास्त काळ टिकत नाहीत, याची कारणे काय असतील यावर हा सिनेमा प्रकाश टाकतो..
Leave a Reply