
मालिकेच्या सेटवर धावपळ, शूटिंग सुरू असलं, तरी काही कलाकार आपल्या छंदांना, आवडींनाही प्राधान्य देतात. स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’या मालिकेतील प्रिन्स दादानं आपली गाण्याची आवड जपण्यासाठी युट्यूबवर चॅनेल सुरू केलं असून, त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.‘नकळत सारे घडले’मध्ये प्रिन्सची भूमिका करणारा आशिष गाडे स्वतः उत्तम वादक आणि गायक आहे. तो गिटार, सिंथेसायजर अशी वाद्य वाजवतो. प्रतापची भूमिका करणारा हरीश दुधाडेही उत्तम गायक आहे. या दोघांची मालिकेच्या ऑडिशनवेळी भेट झाली. गप्पांमध्ये दोघांना एकमेकांच्या संगीताच्या आवडीविषयी कळलं. मालिकेचं शूटिंग सुरू झाल्यावर काही दिवसांनी हरीश आशिषकडून गिटार वाजवायलाही शिकला. त्यानंतर एकदा गंमत म्हणून मेकअप रूममध्ये दोघांनी गिटार वाजवत गाणं गायलं आणि त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिथं त्याचं खूप कौतुक झालं. त्यामुळे आशिषनं ashish gade entertainment युट्यूब चॅनेल सुरू करून नियमितपणे व्हिडिओ शेअर करायचं ठरवलं. मालिकेत संजयची भूमिका साकारणारा सुप्रीत कदमही त्यांच्यात सामील झाला. त्या तिघांनी अनेक सुपरहिट गाण्यांचं एक फ्युजन केलं होतं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आशिष आणि हरीशच्या गाण्यांमुळे सेटवरचं वातावरणही संगीतमय होऊन जातं. या युट्यूब चॅनेललला दोन हजार सबस्क्रायबर्सही मिळाले आहेत.
Leave a Reply