
कोल्हापूर : त्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. ‘स्टार बझार’सारख्या मॉलमध्ये फेरफटका मारुन स्वत:ला आवडणार्या वस्तूची स्वत: खरेदी करणं, पी.व्ही.आर.सारख्या थिएटरमध्ये जाऊन सर्वांसोबत सिनेमा पाहाण्याची मजा लुटणं, त्यानंतर संध्याकाळ झाली असली तरी रंकाळा तलावाच्या काठावर फेरफटका मारुन चाट, पाणीपुरी, आईस्क्रीम अशासारख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं या गोष्टी ‘सावली केअर सेंटर’तर्फे आयोजित निवासी स्वावलंबन शिबिराच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला शिबिरार्थी बहुतेक मुलामुलींनी आयुष्यात प्रथमच अनुभवल्या. मुलांच्या चेहर्यावरची खुषी पाहून त्यांचे पालकही सुखावले नसते तरच नवल!
वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्त्व असणार्या व्यक्तींना सामाजिक जीवनातील छोट्या मोठ्या आनंदांपासूनही वंचित राहावं लागतं ही बाब लक्षात घेऊन या व्यक्तींना शक्य तितक्या प्रमाणात स्वावलंबी होण्यासाठी छोट्यामोठ्या युक्त्या शिकवणं, सार्वजनिक ठिकाणी वावरण्याच्या दृष्टीने त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर आपण काहीच करू शकण्याच्या अवस्थेत नाही या मानसिकतेतून अशा व्यक्तींना बाहेर काढून त्याही जीवनाचा आनंद घेऊ शकतात याची जाणीव करुन देणं अशा उद्देशाने ‘सावली केअर सेंटर’तर्फे 13 मे ते 13 जून या कालावधीसाठी निवासी स्वावलंबन शिबीराचे आयोजन केले होते. बुधवारी सकाळी सर्व शिबिरार्थींना निरोप देण्यात आला, पण तत्पूर्वी म्हणजे मंगळवारी त्यांनी त्यांच्या पालकांसह सिनेमागृह, मॉल, रंकाळा तलावाचा परिसर या ठिकाणी आवर्जून नेऊन वेगळे अनुभव घेतले. सेरेब्रल पाल्सी असणारी मुलंमुली या शिबिराच्या निमित्तानं प्रथमच आईवडिलांपासून एक महिन्यासाठी दूर राहिली. महिन्याभरासाठी त्यांचं सगळं वेळापत्रक आणि वातावरणच या शिबिरामुळं बदलून गेलं होतं. परिणामी काल ‘सावली केअर सेंटर’चा निरोप घेताना या मुलांच्या मनात जशी वेगळी हुरहूर होती त्याचप्रमाणे त्यांना निरोप देताना ‘सावली केअर सेंटर’चे किशोर देशपांडे व त्यांचे सर्व सहकारी हे ही भावविवश झाले. सर्वात बोलकी प्रतिक्रिया ही अनेक पालकांची होती. आपल्या मुलांना ‘सावली’च्या रुपात एक त्यांचं असं नवं घर मिळालं असं पालकांनी आवर्जून सांगितलं.
‘सावली केअर सेंटर’ने अशा प्रकारचे निवासी शिबीर घेत असताना शिबिरासाठी येणार्या प्रत्येक व्यक्तीचा वयोगट आणि अक्षमतेचा प्रकार वेगवेगळा असू शकतो आणि त्यानुसार स्वावलंबनाच्या युक्त्या शिकवण्यासाठीसुद्धा त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात याची जाणीव ठेवून खूपच पूर्वतयारी केली होती. मॉड्युलर किचन, गेम झोन, गप्पाखोली, फिजिओथेरपीसाठी अत्याधुनिक सोयी व प्रशिक्षित कर्मचारी, शिबिरार्थींच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचे मूल्यमापन करून त्यानुसार त्यांना मार्गदर्शनाची व्यवस्था अशा एक ना दोन अनेक गोष्टींसाठी ‘सावली केअर सेंटर’ने जाणीवपूर्वक गुंतवणुक केली. या गुंतवणुकीचा शिबिरार्थींना, त्यांच्या पालकांना फायदाही झाला. हातात सुरीही न धरता येणार्या मुलांनी सॅलड्स तयार करणे पासून बटाटेवडे तळण्यापर्यंतची कामं करून पाहिली. सुंदर चित्रं रंगवली. व्हीलचेअरवरुन कमोडवर शिफ्ट होऊन आपली आपली अंघोळ करणेे, बेडवर शिफ्ट होऊन स्वत:चे कपडे स्वत: घातले. सर्वसामान्य माणसासाठी या गोष्टी किरकोळ असू शकतात परंतु आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून शारीरिक स्थितीमुळे अतिशय अवघड असणार्या साध्या कृती शिबिरार्थींना करता येणं हे त्यांच्या दृष्टीने व शिबिरातील तज्ज्ञांच्या दृष्टीने खूपच मोठे यश होते. एक महिन्याच्या कालावधीत शिबिरार्थींमध्ये मानसिक, शारीरिक कौशल्ये आत्मसात करणे यादृष्टीने कोणते फरक पडले याच्या नोंदी ‘सावली केअर सेंटर’ने ठेवल्या, त्याचबरोबर ‘लोकमान्य हॉस्पिटल’च्या कोल्हापूर व गोव्यातील तज्ज्ञांकडून शिबिरार्थींच्या हाडांच्या स्थितीसह अन्य बाबींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिबिरार्थींना निरोप देताना त्यांनी महिन्याभरात केलेली प्रगती, त्यांच्या स्वभावातील गुणदोष, त्यांच्याबरोबर वागताना पालकांनी व इतरांनी घ्यायची काळजी, शिबिर संपले असले तरी या मुलांचे दैनंदिन वेळापत्रक कसे असावे, त्यांचा आहार व वजन या बाबत कोणती काळजी घ्यावी अशा सूचना लेखी स्वरुपात पालकांच्या सुपूर्द करण्यात आल्या. ज्या गोष्टी लेखी देणे शक्य नव्हते अशा बाबी पालकांशी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधून, समजावून सांगण्यात आल्या.
सावली केअर सेंटरचे प्रमुख किशोर देशपांडे यांनी शिबिराविषयी बोलताना सांगितले की अशा प्रकारची शिबिरे सातत्याने घेतली जाण्याची गरज आहे हे या शिबीरातून स्पष्ट झाले. ‘सावली केअर सेंटर’ यापुढेही वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्त्व असणार्या माणसांसाठी अशी शिबिरे आयोजित करत राहील. आत्ताच्या शिबिरार्थींनाही आवश्यकतेनुसार सल्ला व मार्गदर्शन कायमपणे करण्याची ‘सावली’ची भूमिका आहे. त्यादृष्टीने कोकण, बेळगाव या भागासह शिबिरार्थींच्या घराला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधांची पाहणी केली. शिबीरामध्ये दाखल मुलांनी वेगळ्या वातावरणासह अनेक गोष्टी नव्याने अनुभवल्या, त्यातून ही मुलंमुली मानसिकदृष्ट्या खुली होण्यास मदत झाली. वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असणार्या व्यक्तींनाही सामाजिक जीवन अनुभवण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा हक्क आहे ही जाणीव समाजात रूजवण्यासाठी स्टार बझार किंवा पीव्हीआरला भेट देण्यासारखे उपक्रम राबवण्यात आले. आनंदाची बाब अशी की या दोन्ही ठिकाणी तर व्हीलचेअरसह आलेल्या या पाहुण्यांचे मन:पूर्वक स्वागत करून सर्व प्रकारचे सहकार्य उपलब्ध करून दिले गेले. लोकमान्य हॉस्पिटलने देखील सामाजिक बांधीलकी म्हणून आरोग्य तपासणीच्या उपक्रमात आपला सहभाग दिला. अपंगांसाठीच्या निवासी स्वावलंबन शिबिरामध्ये समाजाचा अशा प्रकारचा सहभाग मिळणे ही खूप स्वागतार्ह बाब आहे!”
Leave a Reply