
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांची जीवनशैली व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडत लहू काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रति असणारा हा जिव्हाळा नक्कीच अनुकरणीय आहे असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी येथे केले.कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने कृषी व्यंगचित्रकार लहू काळे यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनशैलीवर भाष्य करणाऱ्या बळीराजा या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनास रविवार(ता.१७) पासून येथील शाहू स्मारक भवन येथे प्रारंभ झाला. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. २३ जून अखेर हे प्रदर्शन कला दालनात सुरू रहाणार आहे. कोल्हापूर इंडियन मेडिकल असोसिएशन चे पदधिकारी डॉ सोपान चौगले, डॉ अशोक जाधव, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. आबासाहेब शिर्के, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन झाले. प्रशांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अजय दळवी यांनी आभार मानले.
श्री काळे यांची विविध माध्यमातून चार हजाराहून अधिक व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. नुकतीच याची नोंद इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये झाली आहे.. या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर चित्रे काढून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. याची दखल घेऊन कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पाऊस, हवामान, पेरणी हंगाम, खत बियाणे स्थिती, जनावरांची स्थिती याच बरोबर ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर भाष्य केलेली सुमारे दीडशे व्यगचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.२३ जून अखेर हे प्रदर्शन कला दालनात सुरू रहाणार आहे. सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
Leave a Reply