खा.धनंजय महाडिक यांनी दिल्लीला नेलेल्या शालेय मुलांनी घेतली पंतप्रधानांची भेट

 

कोल्हापूर: जिल्हयाच्या ग्रामीण भागातील ३० शालेय मुला-मुलींनी बुधवारी विमानातून थेट दिल्ली गाठली. आज या मुलांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या या मुलांशी मराठीमधून संवाद साधत, त्यांची आस्थेनं आणि आपुलकीनं विचारपूस केली. शिवाय नव्या पिढीच्या मनातील कल्पना, त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी, अभिनव संकल्पनेतून कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील निवडक मुलांना दिल्लीला नेवून संसदेचं कामकाज, राष्ट्रपती भवन तर दाखवलंच, पण पंतप्रधानांची भेट घालून दिल्यानं, या मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पंतप्रधान मोदी यांनी, खासदार महाडिक यांच्या संकल्पनेचंही भरभरून कौतुक केलं.
तुमच्या मनातील प्रश्‍न पाठवा आणि दिल्लीला चला, या खासदार धनंजय महाडिक यांच्या आवाहनाला कोल्हापूर जिल्हयाच्या ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. नवी पिढी हे देशाचं खरं वैभव आणि शक्तीस्थळ आहे. त्यामुळं सध्या शाळेत शिकणार्‍या मुलांच्या दृष्टीनं कोणते प्रश्‍न महत्वाचे आहेत, त्यांना काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी खासदार महाडिक यांनी आठवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं. त्याला ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि जवळपास साडेनऊ हजार प्रश्‍न खासदार महाडिक यांच्याकडं जमा झाले. त्यानंतर शिक्षकांच्या एका समितीनं त्यापैकी २ हजार प्रश्‍न निवडले. त्यानंतर पुन्हा चाळणी करून अडीचशे विद्यार्थ्यांची निवड झाली. खासदार धनंजय महाडिक यांनी, या अडीचशे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली आणि त्यापैकी ३० विद्यार्थ्यांची निवड केली. सर्वसामान्य घरातील, पण चाणाक्ष आणि चुणचुणीत अशा या मुला-मुलींना दिल्ली वारीची प्रचंड उत्सुकता होती. या विद्यार्थ्यांना बुधवारी विमानातून दिल्लीला नेण्यात आलं. आयुष्यात पहिल्यांदाच विमानात बसलेल्या या मुला-मुलींना मनस्वी आनंद झाला होता. आज सकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी, या मुलांची भेट घेवून त्यांचं स्वागत केलं. खासदार महाडिक यांनी, पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून, पंतप्रधानांची वेळ घेतली होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्हयाच्या ग्रामीण भागातील या मुलांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मिळाली. मोदी यांनी या मुलांचं स्वागत करून थेट मराठीत संवाद साधला. मनातील प्रश्‍न विचारा आणि दिल्लीला चला, या खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेविषयी जाणून घेतल्यावर पंतप्रधान मोदी सुध्दा खुश झाले. त्यांनी खासदार महाडिक यांच्यासह सर्वच मुलांशी मनमोकळा संवाद साधला. थेट पंतप्रधानांशी भेट झाल्यानं, मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यानंतर खासदार महाडिक यांनी, या मुलांना संसद आणि राष्ट्रपती भवन दाखवलं. दरम्यान खुद्द पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या खासदारांचं आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केल्यानं, राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी सुध्दा याची दखल घेतली. तर लोकसभा वाहिनीसाठी कोल्हापुरातून गेलेल्या या ३० मुलांची विशेष मुलाखत घेण्यात आली. लवकरच ती लोकसभा चॅनल वरून प्रसारीत होणार आहे. एकूणच खासदार धनंजय महाडिक यांनी, ग्रामीण भागातील मुलांना दिल्लीवारी घडवून त्यांची बुध्दी आणि आत्मविश्‍वास यांना न्याय तर दिलाच. पण आयुष्यभर लक्षात राहिल, असा अनुभवही मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!