दोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा !

 
महाविद्यालयातल्या नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ मैत्रीच्या सुंदर नात्याविषयी असलेल्या ‘दोस्तीगिरी’ ह्या सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. ह्या ट्रेलर आणि म्युझिक लाँचसाठी सिनेमाचा नायक संकेत पाठकचे ऑनस्क्रीन आई-वडील उपस्थित होते. दुहेरी मालिकेतली संकेतची आई, अभिनेत्री निवेदिता सराफ, आणि छत्रीवाली मालिकेत संकेत पाठकच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले अभिनेते अशोक शिंदे ह्यांच्या हस्ते सिनेमाचे संगीत अनावरण झाले.
ह्यावेळेस भावूक झालेला अभिनेता संकेत पाठक म्हणाला, “माझ्या पहिल्या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा आणि त्यात माझे ऑनस्क्रिन आई-वडिल आशिर्वाद द्यायला आले, हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. दोस्तीगिरी सिनेमाचे चित्रीकरणही माझ्यासाठी आठवणीतले होते. कारण ह्या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी मला अक्षय वाघमारे, विजय गीते, पुजा जयस्वाल, पुजा मळेकर असे जिवाभावाचे फ्रेंड्स मिळाले.”
दोस्तीगिरी सिनेमाच्या ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळ्यासाठी संकेत पाठक, पुजा मळेकर, विजय गिते, पुजा जयस्वाल, शुभांगी लाटकर आणि अक्षय वाघमारे ह्या कलाकारांसह संगीत दिग्दर्शक रोहन-रोहन, प्राजक्ता शुक्रे, मिनल जैन, आणि कविता राम ही म्युझिक टीमही उपस्थित होती.
अभिनेत्री निवेदिता सराफ ह्यावेळी म्हणाल्या, “जशी दोस्तीगिरी सिनेमात घट्ट मैत्री दाखवली गेलीय, तशीच अशोक शिंदे आणि माझीही गेल्या तीस वर्षांची घट्ट मैत्री आहे. त्यामूळे माझ्या जुन्या मित्रासोबत दोस्तीगिरी सिनेमाचा ट्रेलर लाँच करणं माझ्यासाठी खूप खास आहे. तसेच संकेत पाठकची मी ऑनस्क्रिन आई झाले होते. आणि तेव्हापासूनच माझी संकेतशीही दोस्तीगिरी सुरू झाली आहे.”संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमाचे लेखन मनोज वाडकर ह्यांनी केले आहे. रोहन-रोहन ह्यांच्या संगीताने सजलेल्या ह्या सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल हे मुख्य भूमिकेत दिसतील. ‘अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स’ प्रस्तूत ‘मोरया मुव्हिज क्रिएशन्स’ निर्मित “दोस्तीगिरी” 24 ऑगस्ट 2018ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!